एका पर्यटकामागे अकरा लोक बेरोजगार! यंदा पंधरा हजार विदेशी पर्यटक अजिंठा, वेरूळपासून वंचित

मनोज साखरे 
Wednesday, 2 December 2020

कोरोना महामारीचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसला. यात सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले. औरंगाबादेतील पर्यटनस्थळांसह अजिंठा, वेरूळ लेण्या बंद असल्याने पाच लाख देशी व पंधरा हजार विदेशी पर्यटकांना या जागतिक स्थळांना भेटी देता आल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, एका पर्यटकामुळे स्थानिक अकरा लोकांना रोजगार मिळतो; पण ही स्थळेच बंद असल्याने रोजगाराचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

औरंगाबाद : कोरोना महामारीचा मोठा फटका पर्यटन उद्योगाला बसला. यात सुमारे पाचशे कोटींचे नुकसान झाले. औरंगाबादेतील पर्यटनस्थळांसह अजिंठा, वेरूळ लेण्या बंद असल्याने पाच लाख देशी व पंधरा हजार विदेशी पर्यटकांना या जागतिक स्थळांना भेटी देता आल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, एका पर्यटकामुळे स्थानिक अकरा लोकांना रोजगार मिळतो; पण ही स्थळेच बंद असल्याने रोजगाराचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

देशातील सर्व पर्यटनस्थळे उघडली जात असताना जागतिक कीर्तीचे वेरूळ, अजिंठा लेण्या मात्र बंदच आहेत. औरंगाबाद जिल्ह्या ७० ते ८० टक्के पर्यटन व्यवसाय या दोन स्थळांवर अवलंबून आहे. अजिंठा लेण्यांभोवती ७८ दुकाने आहेत. शेकडो गाईड, शंभरावर फेरीवाल्यांसह सातशे ते आठशे कुटुंब या व्यवसायावर आहेत; पण कोरोनामुळे मोठे हाल झाले. दहा महिन्यांचे भाडे थकले. हाताला काम नाही; हलाखीच्या स्थितीत हे कुटुंब जीवन व्यतीत करीत आहेत. हीच स्थिती वेरूळचीही आहे. याबाबत टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांनी माहिती दिली की, सामान्यतः एप्रिल ते जुलै हा सामान्य हंगाम असतो. त्यानंतर पर्यटन तेजीत असते. कोरोनामुळे लेण्या बंद असल्याने मार्चपासून साधारणतः सुमारे पाच ते सात लाख भारतीय पर्यटकांना व पंधरा हजार विदेशी पर्यटकांना औरंगाबादेतील पर्यटनस्थळे व अजिंठा, वेरूळला भेट देता आली नाही. अर्थातच हे व्यावसायिक नुकसान आहे.’’ 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हॉटेल व्यवसाय २५ टक्क्यांवर
कोरोनानंतर हॉटेल व्यवसाय पूर्णतः ठप्प होता. त्यानंतर अनलॉकमुळे हा व्यवसाय कसातरी २५ टक्क्यांवर आला आहे. हॉटेलच्या माध्यमातून पर्यटकांना पूर्ण जिल्ह्यातील स्थळे दाखविणाऱ्या एका टॅक्सीचालकाचे शुल्क ९० हजारांपर्यंत जात होते. आता ते बिलिंग साडेचार हजारांवर आले. अर्थातच एक टॅक्सीचालक महिन्याला केवळ साडेचार हजार रुपये मिळत असून आता उपासमारीशिवाय काहीही उरले नाही. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यांना होतो पर्यटनाचा लाभ 
पर्यटक आले तर, रोजगाराला चालना मिळते. विदेशी चलनातही वाढ होते. एक पर्यटक आपल्याकडे आल्यानंतर त्यांना घ्यायला जाणारा, बॅग उचलणारा, कारचालक, हॉटेल्स, हॉटेल्समध्ये बॅग रूममध्ये नेणारा, रेस्टॉरंट, रेस्टॉरंटमध्ये टीप मिळवणारे, पर्यटनस्थळांवरील गाईड, तेथील टिकीट खरेदी, फेरीवाले, हस्तकलेच्या वस्तू व इतर विविध वस्तू विक्रेते यांना लाभ होतो. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven unemployed for one tourist Fifteen thousand foreign tourists deprived from Ajanta Eluru