एसएससी बोर्डाकडून कलागुणांसाठी मिळाली मुदतवाढ 

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

औरंगाबाद - कला संचालनालयातर्फे घेतलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यात दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे कला कोट्यातील वाढीव गुण एसएससी बोर्डाकडे सादर करण्यासाठी बुधवारपर्यंत (ता. 15) मुदत देण्यात आली होती; मात्र या चित्रकला परीक्षेचा निकालच प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव गुण कसे द्यावेत? असा प्रश्‍न "सकाळ'ने वृत्त प्रकाशित करून उपस्थित केला होता. या वृत्ताची दखल घेत एसएससी बोर्डाने आता 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

कला संचालनालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची परीक्षा घेण्यात येते; मात्र यंदा सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यासाठी तारखा जाहीर केल्या. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकाही परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात आल्या होत्या; परंतु अचानक तांत्रिक अडचणी पुढे करीत एलिमेंटरी, इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणूक, दिवाळी यामुळे चित्रकला ग्रेड परीक्षेलाच उशीर झाला. त्यामुळे अद्याप पेपर तपासणी, गुणांचे संकलन करण्याचेच काम सुरू असून, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होणार असल्याचे कलाशिक्षकांकडून सांगण्यात आले. 

कला संचालनालयाकडून निकाल जाहीर केल्यानंतर तो इतर परीक्षा केंद्राकडे पाठवण्यात येतो. तेथून तो निकाल शाळांना दिला जातो आणि शाळांकडून तो निकाल बोर्डाकडे पाठविण्यात येतो. या प्रक्रियेला बराच वेळ लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत वाढीव कला गुणांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करणे शाळांना शक्‍य नसल्याने एसएससी बोर्डाकडून 25 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 

कलेच्या गुणात घट 
मागील वर्षी इंटरमिजीएटसाठी "अ' ग्रेडला 15, "ब' ग्रेडला 10 व "क' ग्रेडला 5 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पंरतु एका वर्षातच यात बदल करून "अ', "ब' आणि "क' ग्रेडला केवळ 7, 5 व 3 गुण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

भोकाडी बुवा आंदोलन 
पुरोगामी शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनेतर्फे गुरुवारी (ता.17) राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर भोकाडी बुवा निदर्शन आंदोलन करून मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, संजय जाधव, राजेश निंबेकर, भागवत शिंदे, मधुकर पाटील, राजेश चौधरी, आनंद पवार, व्यंकटेश चव्हाण, पांडुरंग जाधव, चंद्रशेखर सरोदे, गणेश पवार, विवेक महाजन, विश्वनाथ ससे आदींनी पुढाकार घेतला. आता शिक्षण मंडळाने 25 फेब्रुवारीपर्यंत शास्त्रीय कला, चित्रकला व लोककलेचे परिपूर्ण प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सादर करण्याचे परिपत्रक काढले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com