पिकांचे नुकसान झाल्याचे पाहून शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नानासाहेब जंजाळे
Sunday, 20 September 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील पुरी येथील शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : गेल्या दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे आपल्या पिकाची काय स्थिती आहे. ती पाहण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पिकांचे मोठे नुकसान झालेली पाहवत नसल्याने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना पुरी (ता.गंगापूर) येथे हे शुक्रवारी (ता.१८) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली.

याविषयी अधिक माहिती अशी की, सोपान देवगिरी गिरी (वय ५५) हे आपल्या कुटुंबासह येथे राहत असून त्यांची पुरी शिवारातील गट क्रमांक ६२ व ६९ मध्ये सात एकर जमीन आहे. यावर्षी सुरवातीलाच पाऊस चांगला असल्याने त्यांनी दोन एकर ऊस व पाच एकर कापूस लावला होता. पिकांना खते व फवारणी वेळेवर केल्याने पिकेही जोमात आली होती. गेल्या महिन्यात सततच्या पावसामुळे कापूस पूर्णतः पिवळा पडला असून ऊस मात्र जोमात होता.

दररोज लागतो दोन लाख लिटर ऑक्सिजन, कोविड रुग्णांसाठी वाढत आहे मागणी

यावरच आपल्या शेतीचा झालेला खर्च निघेल अशी आशा त्यांना होती. परंतु काल परवा अचानक वातावरणात बदल होऊन शेंदूरवादा परिसरात जोरदार वाऱ्यासह पाऊस झाल्याने परिसरातील सर्वच उसाचे पीक भुईसपाट झाले आहे. नित्याप्रमाणे सोपानी गिरी हे आपल्या पत्नी गयाबाईसह शेतात पिकाची परिस्थिती पाहण्यासाठी गेले असता आधीच कापूस हाताचा गेल्याने व आता ऊसही भुईसपाट झाल्याने यावर्षीचे पीक पूर्णतः जाऊन आपण उद्ध्वस्त झालो असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या वर्षी झालेला खर्च केलेली उसनवारी खत विक्री त्यांची उधारी हे कशावर फेडायची हे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. या विचारातच त्यांना हृदयविकाराचा पहिला जोरदार झटका आला. त्यांच्या पत्नी गयाबाई यासोबत असल्याने त्यांनी छाती चोळून कसेबसे त्यांना सावरत घरी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु एक शेत ओलांडत नाही तोच दुसरा झटका आल्याने लगतच्या शेतात असलेले संदीप मोरे, रवी मोरे, अमोल राऊत, सचिन राऊत, सेवानिवृत्त तलाठी राधाकृष्ण राऊत यांनी आपल्या दुचाकीवर घेऊन त्यांना गंगापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांना ज्ञानेश्वर हा अविवाहित एक मुलगा असून दोन मुली आहे. या घटनेने शेंदूरवादा परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

लॉकडाउनमुळे मद्यातून मिळणारा अकराशे कोटींचा महसूल बुडाला, मराठवाड्यातील चित्र

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Died Due To Heart attack Aurangabad News