युरोपची कंपनी करतेय थेट बांधावरून कारले खरेदी

शेखलाल शेख
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

देशभर टोमॅटो, डाळिंब पाठविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड काजी गावातील शेतकऱ्यांचे कारले आता थेट युरोपियन देशात जात आहेत. त्यांच्याकडील एक्‍स्पोर्ट क्वालिटीचे कारले कंपनी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत.

औरंगाबाद : दुष्काळी भाग अशी मराठवाड्याची ओळख आहे; पण योग्य नियोजन, व्यवस्थापन केल्यास दर्जेदार शेतमालाचे उत्पादन घेता येऊ शकते हे शेतकऱ्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आहे. देशभर टोमॅटो, डाळिंब पाठविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड काजी (ता. औरंगाबाद) गावातील शेतकऱ्यांचे कारले आता थेट युरोपियन देशात जात आहेत.

त्यांच्याकडील एक्‍स्पोर्ट क्वालिटीचे कारले कंपनी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट बांधावर चांगला दर मिळत असून, कडू कारल्याने दुष्काळातही गोडवा निर्माण झाला आहे. 

No photo description available.

वरूड काजी येथील शेतकरी गणेश लक्ष्मण दांडगे यांच्याकडे एकूण नऊ एकर जमीन आहे. त्यांनी त्यापैकी अडीच एकरमध्ये कारल्याचे उत्पादन घेतले आहे. अगोदर त्यांनी याच अडीच एकरमध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले होते. टोमॅटोची बांधणी अगोदरच केलेली असल्याने कारल्यासाठी नवीन बांधणी त्यांना करावी लागली नाही, त्या खर्चाची यात बचत होते.

त्याच अडीच एकरांवर त्यांनी सप्टेंबर महिन्यात कारल्यांची लागवड केली आता कारल्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यांनी कारले उत्पादन घेण्याचा मागील चार वर्षांपासूनचा अनुभव आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठीचे सगळे व्यवस्थान, नियोजन त्यांच्याकडे आहे. 

Aurangabad

लागवड केल्यानंतर ते दोन महिन्यांनंतर कारले तोडणीसाठी येतात. हे पीक लागवडीपासून पूर्ण चार ते पाच महिन्यांपर्यंत चालते. श्री. दांडगे यांच्या शेतातील एक तोडणी ही चार टनापर्यंत जाते. त्यांच्याकडील अडीच एकरमधील उत्पादन 40 टनांपर्यंत जाण्याची शक्‍यता आहे.

एक्‍स्पोर्ट क्वॉलिटी कारले तोडल्यानंतर त्याला बांधावर 24 रुपये प्रती किलो असा दर मिळतो; तर स्थानिक बाजारपेठेत जाणाऱ्या कारल्यास 15 रुपये प्रती किलो असा दर मिळतो. कारले थेट कंपनी घेत असल्याने शेतकऱ्यांचा चांगलाच आर्थिक फायदा झाला आहे. शेतीच्या पाण्यासाठी गणेश दांडगे यांनी अर्ध्या एकरचे एक शेततळे तयार केले तसेच त्यांच्याकडे दोन विहिरी आहेत. यासोबतच वरूड गावातील रामभाऊ मुरलीधर दांडगे, विजय दादाराव दांडगे यांच्याकडील कारलेसुद्धा युरोपात एक्‍स्पोर्ट होत आहेत. 

कंपनीचे कंटेनर थेट शेतात 

कारले खरेदी करण्यासाठी कंपनीचे कंटेनर हे थेट शेतात येते. येथे मालाची ग्रेडिंग करून एक कॅरेटमध्ये जवळपास 20 किलोप्रमाणे कारले भरले जातात. त्यानंतर हे कारले कंटेनरमधून नगर जिल्ह्यातील कंपनीच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये जातात. तेथे त्याच्यावर निर्जंतुकीकरण केल्यानंतर चार किलोची पॅकिंग केली जाते. त्यानंतर हे कारले मुंबईच्या सहारा एअरपोर्टवरून युरोपियन देशांत पाठविले जातात. 

नियोजन केल्यास चांगले उत्पन्न 

आम्ही अगोदर टोमॅटोचे उत्पादन घेतले. टोमॅटोची बांधणी केलेली असल्याने त्याच बांधणीवर कारल्याचे उत्पादन घेतले आहे. योग्य नियोजन, व्यवस्थापन केल्याने चांगले उत्पादन झाले आहे. सगळे व्यवस्थित राहिले, तर अडीच एकरमध्ये चाळीस टन माल निघण्याची शक्‍यता आहे. 

- गणेश दांडगे (शेतकरी, वरूड काजी)

पाच शेतकऱ्यांकडून कारले खरेदी 

सध्या वरूड काजी आणि परिसरातील पाच शेतकऱ्यांकडून थेट बांधावरून कंपनी कारले खरेदी करत आहे. रोज आम्ही दोन टन कारले खरेदी करतो. ग्रेडिंग झाल्यानंतर त्यांची मोजणी केली जाते. यानंतर हे कारले कंपनीकडे पाठविले जाते. 
- इलियास बेग (व्यापारी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers export agricultural products To Europe Aurangabad News