औरंगाबाद-पुणे महामार्गावर रास्ता रोको, कांदा निर्यात बंद केल्याने शेतकरी संतप्त

जमील पठाण
Wednesday, 16 September 2020

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या विरोधात बुधवारी (ता.१६) जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

कायगाव(जि.औरंगाबाद) : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याच्या विरोधात बुधवारी (ता.१६) जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. पंधरा मिनिटे चाललेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत जोरदार घोषणा देत बंद केलेली निर्यात उठवावी, कांद्याला आणि इतर शेतीमालाला योग्य भाव द्यावा आदी मागण्यांबाबत गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे यांना निवेदन दिले आहे.

छत्रपती उदयनराजेंनीच नेतृत्व करावे, मराठा आरक्षणासाठी विनायक मेटेंनी केले आवाहन

केंद्राने कांदा निर्यात धोरणात बदल करत निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव सोमवारी कोसळले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेला कांदा उत्पादक शेतकरी आणखी हतबल आला आहे. आता मिळणाऱ्या भावापासून कांद्याचे उत्पादन खर्चही पदरात पडण्याची शाश्‍वती नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मागील सहा महिन्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगोदरच शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले असून आता पुन्हा नवीन समस्या समोर उभी राहिली आहे.

निर्यातबंदी पूर्वी कांद्याला एक हजार ५०० ते दोन हजार भाव मिळत होता. मात्र आता कांदा दर आणखी खाली येण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.१६) सकाळी सव्वा अकरा ते साडेअकरा दरम्यान औरंगाबाद-पुणे महामार्गावर जुने कायगाव (ता.गंगापूर) येथील टी-पॉइंटवर शारीरिक अंतर राखत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मराठवाड्यातील विद्यार्थ्‍यांचे होतेय ‘सैन्य’ क्षेत्राकडे दुर्लक्ष, जाणून घ्या...

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब शेळके, कृष्णा पाटील डोणगावकर, माजी सरपंच बाबासाहेब चव्हाण, शेतकरी नेते संपत रोडगे, संतोष गायकवाड, राहुल चव्हाण, सुबूर शेख, रामदास वाघ, गणेश खैरे, राधाकिसन औटे, सुरेश चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे व त्यांच्या पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Rasta Roko Against Onion Export Ban Aurangabad News