गुंगारा देऊन घाटीतून पळालेला कैद्याला पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या

मनोज साखरे
Sunday, 20 December 2020

पोटात गाठ तसेच मूत्रपिंडाच्या आजारामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका कैद्याने पळ काढल्याचा प्रकार शनिवारी (ता.५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास समोर आला.

औरंगाबाद : पोटात गाठ तसेच मूत्रपिंडाच्या आजारामुळे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका कैद्याने पळ काढल्याचा प्रकार शनिवारी (ता.५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास समोर आला. त्यानंतर त्याला गुन्हे शाखा पोलिसांनी आज शनिवारी (ता.१९) ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. किशोर विलास आव्हाड (रा.मुकुंदवाडी) असे त्याचे नाव आहे. किशोर आव्हाड याच्यावर जवाहरनगर आणि छावणी पोलिसात कलम ३५४, ३०४ भादंवि पोस्को १२, १८ नुसार गुन्हा दाखल असून त्याला मुलीवरील अत्याचाराच्या एका प्रकरणामध्ये चार वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

 

आव्हाड याला दोन प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पोटात गाठ तसेच मूत्रपिंडाच्या आजारामुळे घाटी रुग्णालयात दोन डिसेंबरला दाखल करण्यात आले होते. त्याला घेऊन कारागृहाचे दोन कर्मचारी गेले होते. दरम्यान एकजण बाजूला गेल्यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या ताब्यात बंदी होता. त्या कर्मचाऱ्याची नजर चुकवून बंद्याने हातातील हातकडीतून त्याने हळूच स्वतःचा हात काढून घेतला.त्यानंतर त्याने धूम ठोकली. यानंतर पोलिस त्याचा शोध घेत होते. तो शिवाजीनगर रेल्वेरुळाजवळ येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांनी समजल्यानंतर त्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. हि कारवाई उपायूक्त मिना मकवाना, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या सुचनेनूसार सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल व त्यांच्या पथकाने केली.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Prisoner Arrested Who Ran Away From Ghati Aurangabad