भीषण आगीमुळे घरात गुदमरून मुलाचा मृत्यू; आई, बाबा व ताई होरपळले...

fire
fire

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील उल्कानगरी परिसरात खिवंसरा पार्क येथील एका इमारतीच्या ग्राऊंड फ्लोवरवरील स्टोअर रूमला आग लागून वरच्या मजल्यावरील कुटुंब धुराने गुदमरून अत्यवस्थ झाले. यात 14 वर्षीय मुलाचा गुदमरल्याने मृत्यू झाला. कुटुंबातील तिघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण स्पष्ट नसून ही घटना गुरुवारी (ता. 27) पहाटे पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली. 

अग्निशामक दलाकडून प्राप्त माहितीनुसार,  संस्कार शामसुंदर जाधव (14,  रा. उल्कानगरी, औरंगाबाद ) असे मृताचे नाव आहे. मृत मुलाचे वडील शामसुंदर बाबासाहेब जाधव (45),  आई सविता जाधव (40),  बहीण संस्कृती (20) अशी  अत्यवस्थ झालेल्या कुटुंबातील इतरांची नावे आहेत.

उल्कानगरीतील खिवंसरा पार्क या प्रशस्त परिसरात प्लॉट क्रमांक 76,  येथे असलेल्या इमारतीत घरमालक अविनाश पाठक यांच्याकडे  शामसुंदर जाधव भाड्याने राहतात. जाधव यांचा पथदिव्यांशी संबंधित व्यवसाय आहे. 

ग्राऊंड फ्लोवरला जाधव यांचे स्टोअर रूम आहे. याच रूममध्ये एलईडीसह विविध विद्युत साहित्य ठेवण्यात आले आहे. वरच्या मजल्यावर जाधव कुटुंबीय राहतात. बुधवारी (ता. 26) रात्री जाधव कुटुंबीय झोपले. गुरुवारी (ता. 27) पहाटे पाच वाजून 20 मिनिटांनी स्टोअर रूममध्ये आग लागली. आग बराच वेळ धुमसत होती.

जाधव कुटुंबीय झोपीत असल्याने खाली काय घडतेय याची त्यांना कल्पना नव्हतीच. पण जळणाऱ्या विद्युत दिव्यांचा व साहित्याचा मोठा धुराळा जिन्यातील मोकळ्या जागेतून वरच्या मजल्यावर पोहचला. जाधव कुटुंबियांच्या घराच्या खिडक्या बंद असल्याने धूर खोल्यात सर्वत्र पसरला. खाली येण्याच्या मार्गातच आग आणि मोठा धुराळा असल्याने जिन्यातून कुटुंबियांना खाली येता आले नाही. त्यादरम्यान सर्वजण बेशुद्ध पडले. आगीची बाब शेजाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी अग्निशामक दलाला कळविले. 

मुलगा दिसला मृतावस्थेत 
सिडको अग्निशामक दलाचे इन्चार्ज रमेश सोनवणे आणि जवानांचा चमू खिवंसरा पार्क येथे पोचला. त्यांनी पंधरा मिनिटात आग विझवली. जवान खोलीत गेले तेव्हा जाधव कुटुंबीय निपचित पडलेले आढळून आले. यात 14 वर्षीय संस्कार मृतावस्थेत होता. इतरांना घाटीत दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

आगीचे कारण स्पष्ट नाही... 
आग नेमकी कशाने लागली हे स्पष्ट नाही. मात्र स्टोअर रूममध्ये पथदिवे, असेम्बल कीट आणि इतर वस्तुंनी पेट घेतला असावा असा संशय आहे. 

आगीत 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून इतरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग पहाटे पंधरा मिनिटांत आटोक्यात आली. आगीचा धूर प्रचंड होता. खिडकी आणि दरवाजे बंद असल्याने धूर जागीच आणि वरच्या मजल्यावर कोंडून राहिला.
- रमेश सोनवणे, इन्चार्ज, अग्निशामक दल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com