पाच कोविड केअरमध्ये शुकशुकाट, फक्त २१३ रुग्णांवर उपचार

माधव इतबारे
Wednesday, 11 November 2020

औरंगाबाद शहरातील कोरोना संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस खाली येत आहेत.

औरंगाबाद : शहरातील कोरोना संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस खाली येत आहेत. महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी १२ कोविड केअर सेंटर सुरू केले होते. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने सध्या पाच सेंटर बंद अवस्थेत आहेत तर सध्या ॲक्टीव्ह २१३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मृत्युदराची पुन्हा उसळी, औरंगाबादेत दोन लाख ६४ हजार कोरोना चाचण्या निगेटिव्ह

शहरात जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचे तीनशे ते चारशे रुग्ण रोज आढळून येत होते. त्यामुळे महापालिकेने मेल्ट्रॉन हॉस्पिटलसह १२ ठिकाणी कोविड केअर सेंटर्स उभारले आहेत. हे कोविड केअर सेंटर देखील कमी पडतील की काय? असे चित्र काही दिवस होते. पण मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्हची संख्या घटत आहे. त्यामुळे सध्या मेल्ट्रॉन आणि बारा कोविड केअर सेंटरमध्ये आजघडीला २१३ रूग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ५७ रूग्ण हे मेट्रॉन हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

एमआयएमने काढली औरंगाबादेत रॅली, बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश

तसेच एमजीएम स्पोर्टस् कॉम्पलेक्समध्ये २५, एमआयटी बॉइज हॉस्टेलमध्ये ४१, किलेअर्कमध्ये २७, ईओसी पदमपुरा सेंटरमध्ये १८, पीईएस कॉलेजमध्ये नऊ, सिपेटमध्ये २४, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात १२ रूग्ण उपचार घेत आहेत. तसेच घाटी रूग्णालय, चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालय, मेल्ट्रॉन व कोविड केअर सेंटर आणि शहरातील धर्मादाय रूग्णालयांसह खासगी रुग्णालयांत सध्या ६९५ कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४८० रूग्ण हे शहराबाहेरील आहेत. १८८ रूग्ण हे ग्रामीण भागातील तर २७ कोरोना रूग्ण इतर जिल्ह्यातील असल्याचे महापालिकेने दिलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे पाच सेंटर रिकामे
कोरोना रुग्णांची वाढत संख्या लक्षात घेता, ऐनवेळी धावपळ होऊ नये म्हणून, महापालिकेने १२ ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले होते पण रूग्ण नसल्यामुळे सीएसएसएम कॉलेज, देवगिरी कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, माहेश्‍वरी आणि जैन हे पाच कोविड केअर सेंटर सध्या रिकामे आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five Covid Centers Empty, Only 213 Patients Get Treatment Aurangabad