esakal | विदेशातून आलात, मग सात दिवस क्वारंटाइन; औरंगाबाद महापालिकेचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

2quarantine_1_0

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अधिक धोकादायक असलेला विषाणू आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासन आदेशानुसार विदेशातून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जात आहे.

विदेशातून आलात, मग सात दिवस क्वारंटाइन; औरंगाबाद महापालिकेचा निर्णय

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अधिक धोकादायक असलेला विषाणू आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शासन आदेशानुसार विदेशातून आलेल्या नागरिकांची आरटीपीसीआर पद्धतीने कोरोना चाचणी केली जात आहे. त्यानंतर आता विदेशातून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार असून, क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना एमसीईडीच्या वसतीगृहात ठेवले जाणार आहे. ज्यांना खासगी हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा असेल त्यांना मुभा असेल, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.


कोरोनाची ब्रिटनसह इतर युरोपीय देशात नव्याने लाट आली आहे. त्यामुळे भारतात सतर्कता बाळगली जात असून, विदेशातून आलेल्या नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. तसेच केंद्र सरकारने विदेशातून येणाऱ्यांना सात दिवस क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची मंगळवार महापालिका अंमलबजावणी करणार आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी प्रशासक सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.


पाचव्या दिवशी होणार चाचणी
विदेशातून आलेल्या नागरिकांना विमानतळावरून थेट सात दिवस क्वारंटाइन केले जाईल. ज्यांना हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त असेल, त्यांना हॉटेलचे शुल्क आकारून ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल व पाचव्या दिवशी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करण्यात येईल. हा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी सोडले जाईल. घरी गेल्यानंतरही १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल.पाच जणांचा लागला शोध
विदेशातून आलेल्या पाच नागरिकांचा शोध लागत नव्हता. त्यांना शोधून काढण्यात आले आहे. दोघेजण शहरातील असून, दोघे जिल्ह्याबाहेर गेले तर एक जण विदेशात गेला आहे. सहा नागरिक परत ब्रिटनला गेले असून पाच जण बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत. ४७ नागरिक ब्रिटनसह इतर देशातून शहरात आले आहेत. त्यापैकी एक महिला व एक तरुण असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आले तर २९ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, असे डॉ. पाडळकर यांनी दिली.

Edited - Ganesh Pitekar