मराठवाड्याच्या जडणघडणीचे साक्षीदार भुजंगराव कुलकर्णी काळाच्या पडद्याआड, वृद्धापकाळाने निधन

Bhujangrao Kulkarni Aurangabad News
Bhujangrao Kulkarni Aurangabad News

औरंगाबाद : निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव अप्पाराव कुलकर्णी (वय १०३) यांचे बुधवारी (ता.२४) औरंगाबादेत वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्‍चात मुलगा पद्माकर कुलकर्णी, डॉ.उषा नांदेडकर, मंगल बुट्टे या दोन मुली, पुतण्या प्रमोद कुलकर्णी असा परिवार आहे.


तत्कालीन हैदराबाद संस्थानात ५ फेब्रुवारी १९१८ रोजी फकरुल मुल्क जहागिरीत म्हणजे आताच्या बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथे भुजंगरावांचा जन्म झाला. त्यांनी हैदराबाद संस्थानात प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. स्वातंत्र्यानंतर १९५२ मध्ये त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) निवड झाली. औरंगाबाद, नांदेडचे जिल्हाधिकारी, पुणे महापालिकेचे आयुक्त, मंत्रालयात सिंचन, विद्युत आदी विभागाचे सचिव म्हणून त्यांनी समर्थपणे जबाबदारी पार पाडली.

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उभारणीचा काळ, पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिरासारखी विविध विकासकामे, भंडारदरा धरणाची दुरुस्ती, १९६१ ची जनगणना अशा अनेक कामांतून त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. निवृत्तीनंतरही त्यांनी मराठवाडा विकास महामंडळ, मराठवाडा अनुशेषासंदर्भात वि. म. दांडेकर समिती, अकृषी विद्यापीठांची लेखा समिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, मराठवाडा वैधानिक मंडळात उल्लेखनीय कार्य केले.

मराठवाड्याच्या विकासातील भरीव योगदानाबद्दल भुजंगराव यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

वाचा - कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात दहा शाळा बंद, अनेक शिक्षक बाधित

निवृत्तीनंतरही मोठे कार्य
मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या विकासाबद्दल जागरूक असलेले भुजंगराव राज्याच्या जडणघडणीचे साक्षीदार होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद व कार्यकारी संचालकपद सांभाळले. राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य, लेखा समितीचे अध्यक्ष, कुलगुरू निवड समितीचे अध्यक्ष, राज्यातील अकृषी विद्यापीठाच्या लेखा व हिशेब पद्धतीच्या अभ्यासासाठी राज्यपालांनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळाचे सदस्य, मराठवाडा वैधानिक महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य, नांदेड विद्यापीठ स्थापनेच्या समितीचे सदस्य, औरंगाबाद देवगिरी टेक्स्टाईल मिल व्यवस्थापनात संचालक, राज्य सिंचन आयोगाचे सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी भरीव कामे केली.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे ते २३ वर्षे उपाध्यक्ष होते. भारतीय ग्रामीण कामगार संस्थेचे अध्यक्ष, सिटीझन फोरमचे अध्यक्ष, चिपळूण प्रबोधिनीच्या कार्यकारिणीचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ स्मारक संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्षपदी त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. औरंगाबादच्या सेंट्रल कंपनीचे अध्यक्ष, वाळूज येथील आयसीम नावाच्या इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. यासह त्यांचे ‘मराठवाड्याचा विकास, अभ्यास व चिंतन’ हा ग्रंथ आणि ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com