तीन आठवड्यांचे मिळते आयुष्य, तरी देतात मनमुराद आनंद 

Aurangabad City news
Aurangabad City news

औरंगाबाद : त्यांचे आयुष्य अवघ्या तीन आठवड्यांचे. मात्र आपले काम करत असताना किती जगलो यापेक्षा किती कसे जगलो हे महत्वाचे असे म्हणतात. अगदी तसेच आयुष्य जगत असतात हे इवलेसे जीव. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे ते अतिशय प्रिय, त्यांच्या मोहक हालचाली अनेकांना भुरळ पाडतात. लहान मुले त्यांना पकडण्यासाठी धावतात त्यात त्या इवल्याशा जीवांना कधी कधी मरणही येते. मात्र, सध्या स्थानिक झाडांऐवजी उद्यानांमध्ये परदेशी झाडांचे पेव फुटले आहे. माणसांना भलेही परदेशी गोष्टींचे कितीही कौतुक वाटत असले तरी या फुलपाखरांना मात्र त्याचे काहीच कौतुक वाटत नसल्याने उद्यानांमध्ये कमी संख्येने दिसत आहेत. 

पावसाळ्यात नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या टाकळ, दुधी, तरवटा, खैर, पाडळ, रूई, कुर्डूची झुडपांची संख्या मोठी, सार्वजनीक उद्यानामंध्ये देखील या वनस्पती, वेली खूप दिसायच्या. त्यावर मोठ्या संख्येने रंगबिरंगी फुलपाखरे बागडताना दिसायची. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच फुलपाखरू उडून दूर जाते. त्याला पकडण्यासाठी लहान मुलांची धावपळ व्हायची मात्र आता शेतीमध्ये रासायनीक औषधींचा वापर वाढल्याने आणि परदेशी झाडांची लागवड वाढत असल्याने फुलपाखरांची संख्या घटत आहे. जंगली झाडे, वनस्पती म्हणून आपण ती उपटून टाकतो मात्र त्यामुळे फुलपाखरांचे आयुष्य खुंटवुन टाकतो आहोत. 

परागीभवनाचे काम 
 
निसर्गप्रेमी डॉ. किशोर पाठक म्हणाले, की फुलपाखरे आनंददायी, चैतन्यदायी असतात. दुसऱ्यांना आनंद देण्याबरोबरच ते सतत कार्यमग्न राहतात. फुलांचा मधुरस पिण्याबरोबरच ते परागीभवनाचे काम करतात. परागीभवनामुळे झाडांना फुले, फळे लगडतात. काही फुलपाखरे पानांचा, काही फुलांचा मधुरस पितात. तर काही फुलपाखरे मातीतील पाणी पिण्यासोबतच क्षार शोषून घेतात. खडकावर समुहाने बसून क्षार शोषतात. स्वतःही आनंदी राहतात आणि दुसऱ्यांनाही आनंद देतात हा त्यांचा गुण माणसाने शिकण्यासारखा असल्याचे मत डॉ. पाठक यांनी व्यक्त केले. 
 
जिल्ह्यात ४८ प्रकारची फुलपाखरे 

डॉ. पाठक म्हणाले, की औरंगाबाद शहर व ग्रामीण भागात ४८ प्रकारची फुलपाखरे पहायला मिळतात. हा सहा पाय असलेला खवलेयुक्त किटक आहे. पंखावरच्या खवल्यांमुळेच फुलपाखरांचे पंख विविधरंगी असतात. फुलपाखरे दिवसा भिरभिरतात तर पतंग रात्रीच्यावेळी दिसतात. शहरात सलिमअली सरोवर, हिमायतबाग, सिडकोतील प्रियदर्शनी उद्यान, चिकलठाणा एमआयडीसीचा परिसर व अन्य काही ठिकाणी मोठ्या संख्येने फुलपाखरे दिसत आहेत. कोळी, माश्या, पक्षी, सरडे फुलपाखरांचे शत्रू आहेत. निसर्गातील अन्नसाखळीतील फुलपाखरू एक महत्वाचा घटक आहे. फुले, फळे यांच्या निर्मितीसाठी परागीभवन करण्यासाठी ते खूप आवश्याक आहेत. यासाठी जंगली समजून कोणतीही झाडे, झुडूपे, वेली उपटून न टाकता या सुंदर, विविधरंगी फुलपाखरांचे सृष्टीत अस्तित्व टिकवण्यासाठी देशी झाडे लावावी आणि जगवली पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com