कोरोनामुळे छत्तीस तासात चौघांचा मृत्यू,  आज 35 पॉझिटिव्ह 

मनोज साखरे
Wednesday, 13 May 2020

आज दिवसभरात 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  आता औरंगाबादची रुग्णसंख्या 653 वरून 688 इतकी झाली आहे. 27 एप्रिलपासून आजपर्यंत 635 रुग्ण वाढले असून, आधीच्या 42 दिवसांत 53 रुग्ण होते.  

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच आता रुग्णांच्या मृत्यूमुळे चिंता अधिक वाढत आहे. गत 
छत्तीस तासात तीन महिला व एका पुरुषाचा मृत्यू झाला. यातील दोन रुग्णांचा बुधवारी (ता. 13) मृत्यू झाला आहे.  आज दिवसभरात 35 रुग्ण वाढले. शहरातील कोरोनाच्या मृत्यूचा आकडा 19 वर पोचला असून एकूण रुग्णसंख्या 688 झाली आहे.  

 गारखेडा परिसरातल्या हुसैन कॉलनी येथील 58 वर्षीय महिलेला मंगळवारी (ता. 12) दुपारी बारानंतर  घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. मृत्यूनंतर बुधवारी (ता. 13) त्यांचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस ड्यु टू कोविड -19 इन केस ऑफ डायबेटीस मलायटिस विथ हायपोथायरॉईडीझम आहे. 

बीड बायपास रोडवरील अरुणोदय कॉलनी येथील 94 वर्षीय महिलेचा घाटीत (ता. 12) सांयकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस विथ रेस्पारेटरी फेल्युअर विथ कोविड -19 हे कारण आहे.  

सिल्क मिल कॉलनी येथील 65 वर्षी एक कोरोना बाधित महिलेला घाटी रुग्णालयामध्ये 12 मे रोजी भरती करण्यात आले होते. 13 मे रोजी पहाटे चार वाजता या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायोलटरल न्यूमोनायटिस ड्यु टू कोविड -19 केस ऑफ डायबेटीस मेलीटीस विथ हायपर टेन्शन विथ इसकेमिस हार्ट डीसीज आहे.

हेही वाचा- आता अंतिम दर्शन ही एक फुटावरुन

 रहेमानिया कॉलनी येथील 59 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला. या रुग्णाला खासगी रुग्णालयात 13 मे रोजी पहाटे दाखल करण्यात आले होते. त्यांचा न्यूमोनिया आणि कोविड -19 मुळे मृत्यू झाला. त्यांना आधीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाब होता. त्यांना दिन दिवसांपासून ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होता. अशी माहिती खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 

आज दिवसभरात 35 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.  आता औरंगाबादची रुग्णसंख्या 653 वरून 688 इतकी झाली आहे. 27 एप्रिलपासून आजपर्यंत 635 रुग्ण वाढले असून, आधीच्या 42 दिवसांत 53 रुग्ण होते.  

आज या भागात आढळले रुग्ण 

पुंडलिकनगर,  सिडको एन-आठ चैतन्य हाऊसिंग सोसायटी, रामनगर,  संजयनगर, भावसिंगपुरा, पद्मपुरा, भुजबळनगर, नंदनवन कॉलनी, वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी, हुसेन कॉलनी, गांधीनगर, रविवार बाजार, जयभवानीनगर, विजयनगर, गारखेडा, सातारा परिसर, रहेमानिया कॉलनी गल्ली क्रमांक चार, घाटी कॅम्प, भडकलगेट, अरुणोदय कॉलनी बीडबाय भागात या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले. याशिवाय दुपारी सात भागात आणि सायंकाळी रहेमानिया कॉलनी 01, घाटीत उपचार घेणारा 1(रा. मूळ -आन्वा मारुतीमंदिर भोकरदन),   सिल्लेखाना 01, नाशन दर्गा-शहाबाजार 01 या चार भागांतील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासन आणि घाटी रुग्णालयाकडून देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Corona Patient Death 35 positive Aurangabad News