पाच मित्रांनी घेतली लॉकडाऊनमध्ये दहा कुटूंबांच्या रेशनची जबाबदारी 

मधुकर कांबळे  
बुधवार, 25 मार्च 2020

महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक वस्तूंचे सोमवार ( ता.२३ ) पासून वाटप करण्यास सुरू केले आहे. यात पीठ, मीठ, तेल, डाळ, तांदूळ, भाज्या व त्या कुटुंबातील ज्या वयोवृद्ध व्यक्ति आजारी आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी देण्यात येत आहे. 

औरंगाबाद -  लॉकडाऊन म्हणजे काय हे हातावर पोट असणाऱ्यांना माहित नाही, मात्र त्यांच्या हाताला काम नाही. मोठी माणसे कसेही दिवस काढतील मात्र लहान मुलांचे भुकेने व्याकुळ झालेले चेहरे पाहवले नाहीत. यामुळे सुराणानगरातील संवेदनशील पाच मित्रांनी कॉलनीजवळच्या दहा कुटूंबांच्या रेशनची २१ दिवसांसाठी जबाबदारी घेतली. 

क्‍लिक करा : घरातच राहू या, घरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पोहोचू या 

ॲम्बुलन्स हेल्प रायडर्स या ग्रूपच्या माध्यमातून अपघातग्रस्तांच्या मदतीला धाऊन जाणारे ॲड. अक्षय बाहेती याकाळात घरातच राहून आपण काय करु शकतो या विचारात असताना त्यांनी हा पर्याय शोधला आहे. ॲड. बाहेती यांनी सांगीतले, या २१ दिवसात हातावर पोट असणारे काय करतील. आपण आपल्या घरात राहून त्यांच्यासाठी कशी मदत करु शकतो असा विचार करुन मित्रमंडळीकडे हातावरचे पोट असणाऱ्या काही कुटूंबांना मदत करण्याचा प्रस्ताव मांडला. माझ्यासह अमोल कुलकर्णी, प्रणव दानी, विनोद रुकर, आशिष बजाज तयार झालो. आम्ही सर्वांनी मिळून दहा कुटूंबांना मदत करण्याचे ठरवले. 

हेही वाचा : जिल्हा परिषदेत येण्याएवजी जनतेने घ्यावा फोनवर फॉलोअप 

अॅड. अक्षय बाहेती व त्यांच्या मित्रांनी ते राहत असलेल्या सुराणानगर - बसैय्येनगर जवळील बायजीपुरा हा भाग निवडला. या भागात रोजच्या रोज काम केले तरच त्यांचे घर चालतील असे अनेक लोक राहतात. त्यातील अतीशय हालाखीची परिस्थिती असलेल्या दहा कुटुंबांची निवड केली. त्यांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक वस्तूंचे सोमवार ( ता.२३ ) पासून वाटप करण्यास सुरू केले आहे. यात पीठ, मीठ, तेल, डाळ, तांदूळ, भाज्या व त्या कुटुंबातील ज्या वयोवृद्ध व्यक्ति आजारी आहेत त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी देण्यात येत आहे. 

प्रशासन त्यांच्यापरीने प्रयत्न करीतच आहे पण आपण सुजान नागरीक म्हणुन आपापल्या परिने व समुहाने मदत केली तर अशक्य काहीही नाही. किमान शहरात या २१ दिवसात कोणीही गरजवंत उपाशी राहणार नाही. आम्ही करु शकलो, आपणही सुरुवात करा. 
अॅड. अक्षय बाहेती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friends Supplying Grossery To Needy People Coronavirus Lockdown Aurangabad News