औरंगाबादकरांनो सावधान! नाल्यात कचरा टाकला तर महापालिका करणार थेट गुन्हा दाखल 

Aurangabad.jpg
Aurangabad.jpg

औरंगाबाद : शहरातील नाल्यांमध्ये कचरा टाकताना कोणी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. रविवार (ता. २९) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २८) सांगितले. 

पावसाळ्यापूर्वी महापालिकेला दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून नाले सफाई करावी लागते. त्यानंतरही अनेक भागात नाले तुंबून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेक भागात रहिवासी नाल्यात कचरा टाकतात. काही हॉटेलचालक उरलेले अन्नपदार्थ, व्यापारी थर्माकोलचा कचरा नाल्यात टाकतात. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. नाल्यात कचरा टाकू नये, यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती करण्यात आली. तरीही नागरिक दुर्लक्ष करत असल्याने आता थेट कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यासंदर्भात महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात शनिवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला सिव्हिक रिस्पॉन्स टीमच्या नताशा जरीन, गौरी मिराशी आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे डेप्युटी सीईओ पुष्काल शिवम उपस्थित होते. रस्त्यावर, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांच्या विरोधात आत्तापर्यंत दंडात्मक कारवाई केली जात होती. आता फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुक्‍त आस्तिककुमार पांडेय यांनी आता दिले आहेत. अशा नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कक्षाला निर्देश देण्यात आले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षणासाठी टोकाचा निर्णय 
महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भरीव कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनजागृती म्हणून ‘लव्ह औरंगाबाद’ मोहिम राबविण्यात आली. त्यानंतर दोन आठवडे स्वच्‍छता अभियान राबविण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com