गौताळा अभयारण्यात येऊ शकतो पट्टेरी वाघ, जबाबदारी वाढली 

संकेत कुलकर्णी
Wednesday, 1 January 2020

औरंगाबाद जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यात पिवळे पट्टेरी वाघ मोठ्या संख्येने असल्याची नोंद ब्रिटिशांच्या गॅझेटियरमध्ये आहे. एका वाघाच्या शिकारीसाठी त्याच्या मागावर आलेल्या इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ याला अजिंठा लेणीचा शोध लागल्याची कथा प्रसिद्ध आहे.

औरंगाबाद : मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवरील अजिंठा सातमाळा डोंगररांगेत असलेल्या गौताळा अभयारण्यात पूर्वी पिवळे पट्टेरी वाघ मोठ्या संख्येने होते. पण गेल्या 47 वर्षांत या जंगलातून वाघ संपले ते संपलेच. आता मात्र पुन्हा या जंगलात वाघ येऊ शकतो. 

ज्या जंगलात वाघ आहे, त्या जंगलातील वन्यजीव परिसंस्था परिपूर्ण आणि समृद्ध आहे, असे समजले जाते. फर्दापूर-सोयगाव वनक्षेत्रात गेल्या महिन्यात आलेला टिपेश्‍वरचा सी-1 वाघ परत गेला असला, तरी या भागात वाघाचा अधिवास प्रस्थापित होऊ शकतो. हा वाघ पुन्हा येऊ शकतो आणि गौताळा अभयारण्यात आपला प्रदेश प्रस्थापित करू शकतो, असा अंदाज वन्यजीव अभ्यासक आणि वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

Related image
अजिंठा क्षेत्रात येऊन गेलेला टिपेश्वरचा सी-१ वाघ

खरोखर इथे भरपूर वाघ होते 

औरंगाबाद जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यात पिवळे पट्टेरी वाघ मोठ्या संख्येने असल्याची नोंद ब्रिटिशांच्या गॅझेटियरमध्ये आहे. एका वाघाच्या शिकारीसाठी त्याच्या मागावर आलेल्या इंग्रज अधिकारी जॉन स्मिथ याला अजिंठा लेणीचा शोध लागल्याची कथा प्रसिद्ध आहे. त्यापूर्वी आणि नंतरही या भागातील वाघांची संख्या इंग्रजांनी नोंदवली आहे. 

गुड न्यूज - अजिंठ्याच्या जंगलात येऊन गेला वाघ

दौलताबादच्या किल्लेदार जगताप घराण्यातील हिरूभाऊ जगताप यांनीही स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबाद परिसरात वाघाची शिकार केल्याचे सांगितले जाते. चाळीसगाव-पाटणादेवी अभयारण्यात 1972मध्ये शेवटचा वाघ दिसला होता. चाळीसगावचे प्रसिद्ध शिकारी डॉ. पूर्णपात्रे यांनी या वाघाची शिकार केली होती. त्यांच्याकडे तेव्हा शिकारीचा परवानाही होता. त्या वाघानंतर गौताळ्यात कधीही वाघ दिसला नाही. काही जणांच्या मते, 1972 या वर्षीच औरंगाबादच्या एका शिकाऱ्याने गांधेली परिसरात वाघाची शिकार केल्याची अधिकृत नोंद वन विभागाकडे आहे. 

No photo description available.
सी-१ वाघाच्या प्रवासाचा मार्ग

असा आहे जुना टायगर कॉरिडोर 

निवृत्त उपवनसंरक्षक राजेंद्र धोंगडे यांच्याशी 'सकाळ'ने बातचीत केली असता ते म्हणाले, "गडचिरोली- चंद्रपूर- नागपूर- यवतमाळ- बुलडाणा- जळगाव असा जंगलाचा पट्टा जुना टायगर कॉरिडोरच आहे. इथपर्यंत आलेला वाघ पुढे सातपुड्यातून यावल वगैरे भागातून मध्य प्रदेशच्या वनातही प्रवेश करू शकतो. मात्र मराठवाड्यात अनेक ठिकाणी आता जंगलांचे फक्त पुंजके उरले आहेत. त्यामुळे इकडे वाघांना पुरेसा अधिवास मिळू शकत नाही. नसता हा जुना वाघांचा प्रदेश होताच.'' 

तो पुन्हा येईल 

आता अजिंठ्यापर्यंत येऊन गेलेला वाघ हा फक्त प्रदेशाचा अंदाज घेईल. वनांचा सुरक्षित पट्टा, पुरेशी लपण आणि सुरक्षित अधिवास मिळाला, तर तो पुन्हा येऊ शकतो. आपला प्रदेश प्रस्थापित करणे, ही त्याची गरज आहे. तसे झाले, तर जोडीदार शोधणे ही दुसरी गरज असेल, असेही श्री. धोंगडे म्हणाले. 

Image result for gautala abhayaranya
वनस्पती आणि वन्यजीवांनी समृद्ध गौताळा अभयारण्य

वन विभागाची जबाबदारी वाढली 

पुरेशी सुरक्षा आणि अन्नसाखळीप्रमाणे त्याला लागणारे खाद्य जंगलात विपुल प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे. वन विभागाने वाघाचे हे आगमन 'डोक्‍याला ताप' म्हणून न पाहता, आव्हान म्हणून स्वीकारावे. एखादा प्राणी आपल्या वनक्षेत्रात येऊ पाहत असेल, तर त्याला सुरक्षित अधिवास मिळून देणे आणि परिसंस्था प्रस्थापित करणे, हे वन्यजीव व्यवस्थापनाचे आव्हान आहे. आता सी-1 वाघामुळे या कामांना सुरवात झाल्यास जुना अधिवास पुनरुज्जीवित होऊन आपल्याकडे पुन्हा वाघ स्थिरावतील, असेही राजेंद्र धोंगडे म्हणाले. 

वाचा - बिबट्याच्या तावडीतून असे बचावले दांपत्य

अजिंठा वनक्षेत्रात वाघ आल्याची घटना त्या जंगलाच्या दृष्टीने चांगले चिन्ह आहे. वन विभागाने आता या जंगलात वाघांसाठी सुरक्षित अधिवास कसा निर्माण होईल, हे पाहणे गरजेचे आहे. नागरिकांनी मात्र, वाघाला आपला शत्रू न समजता पुरेशा सावधानीने राहायला हवे. 
- सुरेश चोपणे, ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक, चंद्रपूर. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gautala Sanctuary Forest Could Be A Good Reserve For Tiger Again Aurangabad Ajanta News