तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

योगेश पायघन
Monday, 6 January 2020

घाटीत सहयोगी प्राध्यापक असलेल्या या डॉक्टरला आपल्याला मनोविकार असल्याच्या संशयाने पछाडले. आणि त्याने तीन प्रकारची इंजेक्‍शन्स सलाईनमधून घेतली.

औरंगाबाद : आपल्य़ाला मनोविकार जडला आहे, या संशयातून शहरातील एका तरुण डॉक्‍टरने तीन प्रकारची झोपेची इंजेक्‍शन्स स्वतःला सलाईनच्या सुईने टोचून घेत आत्महत्या केली.

ही धक्कादायक घटना सोमवारी (ता. सहा) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. डॉ. के. शेषाद्री गौडा (वय 28, रा. श्रद्धा अपार्टमेंट, बेगमपुरा) असे मृत डॉक्‍टरांचे नाव आहे. 

अत्यंत हुशार आणि सर्वांशी मिळूनमिसळून राहणाऱ्या या डॉक्टरच्या आत्महत्येमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शोककळा पसरली आहे.

वाचा - पत्नीला पाठवले नाही, सासूला जिवंत जाळले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. के. शेषाद्री यांनी रविवारी रात्री तीन प्रकारची झोपेची इंजेक्‍शन्स स्वतःला सलाईच्या सुईने टोचुन घेतली. रात्री मेसचा डब्बा घेण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सकाळी रुममेटने फोन केले. त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेषाद्री यांच्या डॉक्‍टर मित्रांनी पोलिसांत धाव घेत दरवाजा उघडण्याची मागणी केली.

बेगमपुरा पोलिसांनी धाव घेत फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यावेळी शेषाद्री हे बेडवर सलाईन घेतलेल्या बेशुद्ध अवस्थेत आढळुन आले. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलिसांत करण्यात आली आहे. 

क्लिक करा - एकाच मांडवात साडे आठशे मुलींचे नामकरण

शेषाद्री यांच्याजवळ एक सुसाईड नोटही पोलिसांना सापडली असून, ती ताब्यात घेण्यात आली आहे. या घटनेची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी डॉ.शेषाद्री यांच्या नातेवाईकांना दिली असून, ते औरंगाबादकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय म्हटलेय नोटमध्ये?

मला लहानपणापासून मोठा निष्णात डॉक्‍टर व्हायचे होते. त्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. मात्र, मला बायोपोलार डिसऑर्डर हा आजार असल्याचा संशय आहे. त्यामुळे मी माझे जीवन तीन प्रकारची झोपेची इन्जेक्शन्स घेऊन संपवत आहे. या घटनेला माझ्याशिवाय कुणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये.

Image may contain: 6 people, people smiling, people standing and indoor
गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल काही दिवसांपूर्वीच डॉ. शेषाद्री यांचा सत्कार करताना अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर.

गोल्डमेडलिस्ट डॉक्‍टर

डॉ. शेषाद्री गौडा मूळ कर्नाटकातील रहिवाशी होते. त्यांनी एमबीबीएस तेथून, तर एमडी मेडीसीन ही डिग्री घाटीतून पूर्ण केली. त्यात शेषाद्री पहिले आल्याने नुकताच त्यांचा सुवर्णपदाकाने गौरव करण्यात आला होता. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनीही त्यांचा नुकताच सत्कार केला होता.

रुग्णस्नेही व वरिष्ठांचा लाडका

रुग्णस्नेही व वरिष्ठ डॉक्‍टरांचा लाडका म्हणून ओळख असलेल्या शेषाद्री हे मितभाषी होते. शिवाय ते परिचारिका व कर्मचाऱ्यांतही आवडीचे डॉक्‍टर होते. गेल्या ऑगस्टपासून ते मेडीसीन विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणुन कार्यरत होते.

अरेरे - हे आयुर्वेदिक झाड होतेय दुर्मिळ

एमआयसीयू व आयसीयूत त्यांनी चांगली कामगिरी केली होती. गेल्या बुधवारपासून ते आजारी असल्याने सुटीवर असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. लाडक्‍या डॉक्‍टरच्या आत्महत्येने घाटीत डॉक्‍टर परिचारिका, कर्मचाऱ्यांसह इंटर्न डॉक्‍टरांनी त्यांना पाहण्यासाठी घाटीत गर्दी केली होती. 

दरम्यान, प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, उपाधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. गजानन सुरवडे, डॉ. प्रभाकर जिरवणकर आदींनी विद्यार्थ्यांना धीर देत सांत्वन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghati Aurangabad Hospital Gold Medalist Doctor Suicide Aurangabad Breaking News