फूल ना फुलाची पाकळी, आम्हालाही द्या हो; थकीत बिलांसाठी कंत्राटदारांचा पालिका आयुक्तांकडे तगादा

माधव इतबारे
Tuesday, 3 November 2020

औरंगाबाद  महापालिकेकडे कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. यातील ४० कोटींची बिले दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

औरंगाबाद :  महापालिकेकडे कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. यातील ४० कोटींची बिले दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र त्यात मोठ्या कंत्राटदारांचाच समावेश असून, अत्यावश्‍यक छोटी-मोठी कामे करणाऱ्यांचा विचार करण्यात आला नाही. दिवाळीचा सण तोंडावर आहे, त्यामुळे आम्हांला देखील फुल ना फुलाची पाकळी द्या... अशी मागणी मंगळवारी (ता. चार) कंत्राटदारांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप! राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना हॅट्ट्रीकची संधी

कंत्राटदारांच्या थकीत बिलांपैकी ४० कोटींची बिले काढण्याची सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लेखा विभागाला केली होती. त्यानुसार मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी १३ ते १४ ऑक्टोबर दरम्यान कंत्राटदारांना ४० कोटींची बिले दिल्याचे सांगितले जात आहे. ज्यांना बिले देण्यात आली आहेत, त्यात रस्त्याचे काँक्रीटीकरण करणाऱ्या कंत्राटदारांचाच मोठा समावेश असल्याची तक्रार करत इतर कंत्राटदारांकडून केली जात आहे. ३० ते ३५ टक्केच कंत्राटदारांना बिले मिळाली. त्यामुळे कंत्राटदार संघटनेचे बंडू कांबळे यांच्यासह इतरांनी मंगळवारी प्रशासकांची भेट घेऊन फुल ना फुलाची पाकळी, म्हणून काही प्रमाणात बिले देण्यात यावीत, अशी मागणी केली. दिवाळीपर्यंत काही बिले काढली जातील, असे आश्‍वासन दिल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

मजुरांअभावी कापसाच्या वेचणीवर जातोय अर्धा खर्च! शेतकरी शाळकरी मुलामुलींसह शेतात

फेब्रुवारीत बिलाचा दुसरा टप्पा
महापालिकेकडे असलेल्या थकीत बिलाचा आकडा २२१ कोटी रुपये एवढा होता. त्यापैकी ४० कोटीची बिले सध्या वाटप करण्यात आली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उर्वरित १८१ कोटींची बिले फेब्रुवारी २०२१ मध्ये दिले जातील, असे मुख्य लेखाधिकारी पवार यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give As Possible As Unpaid Bill Payment Contractors Asked To Municipal Commissioner