या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

विकास देशमुख
Friday, 10 January 2020

तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे.

औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी' चित्रपट आज (शुक्रवारी) प्रदर्शित झाला. त्यामुळे तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनकार्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला. नरवीर तान्हाजी यांच्या पार्थिवावर छत्रपती शिवरायांनी आपली कवड्यांची माळ अर्पण केली होती. ती माळ आणि तान्हाजी यांची तलवार आजही मालुसरे यांच्या बाराव्या वंशजांनी श्रद्धेने जतन केली आहे. त्या बद्दल eSakal.com च्या वाचकांसाठी खास माहिती.

नरवीर तान्हाजी यांच्या बाराव्या पिढीने आजही मालुसरे कुटुंबीयांच्या अकरा पिढ्यांचा इतिहास कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड या ठिकाणी जतन करून ठेवला आहे. यामध्ये शिवाजी महाराजांनी अर्पण केलेल्या कवड्यांच्या माळेसोबत तान्हाजी यांच्या तलवारीचासुद्धा समावेश आहे.

No photo description available.

ही माळ सध्या डाॅ. शीतल मालुसरे यांच्याकडे आहे. नरवीर तान्हाजी यांचे थेट बारावे वंशज दिवगंत शिवराज यांच्या शीतल पत्नी आहेत. शिक्षिका असलेल्या शीतल व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या रायगड जिल्ह्यातील महाड येथे वास्तव्याला आहेत. त्यांच्याकडे सध्या ही कवड्याची माळ आहे तर तान्हाजींची तलवार अजूनही पारगड किल्ल्यावर आहे, अशी माहिती डाॅ. शीतल यांनी दिली. 

Image may contain: 4 people, people smiling, people standing
मालुसरे कुटुंबातील सदस्य. 

हा आहे पारगडचा इतिहास
डाॅ. शीतल मालुसरे यांनी सांगितले की, पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी इसवी सन 1676 मध्ये पारगड हा किल्ला (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) बांधला. तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्यासाठी वीरमरण आले. स्वतःच्या पुत्राचे लग्न पुढे ढकलून नरवीर तान्हाजी हे स्वराज्यासाठी मोहिमेवर गेले होते. त्यांच्या वीर मरणानंतर काही महिन्यांनी त्यांचे पुत्र रायबा यांचे लग्न झाले. त्यानंतर  छत्रपतींनी रायबा यांना पारगड या किल्ल्याचे किल्लेदार केले.

या किल्ल्याने मालुसरे कुटुंबाच्या तब्बल 11 पिढ्या पाहिल्या. बाराव्या पिढीचेही या किल्ल्याशी अतुट नाते आहे.  अलीकडच्या काळात पारगडावरील मालुसरे कुटुंबातील सदस्य शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त बेळगाव, महाड आणि कोल्हापुरात स्थायिक झाले. पण, नरवीर तान्हाजी यांची तलवार आजही या किल्ल्यावर आहे. पेशवे व ब्रिटिश काळातही मालुसरे कुटुंबाकडे पारगडच्या किल्लेदार हे पद कायम होते. या बाबत 15 मार्च 1864 ला ब्रिटिशांनी दिलेली सनद  आजही मालुसरे कुटुंबीयांकडे आहे. 

शेलार मामांचे वंशजही पारगडावर
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशजासह शेलार मामांचे वंशजही आहेत. त्यांच्याकडे इतिहासातील अनेक महत्त्वाच्या नोंदी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे खुद्द शिवाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावर राहिले होते. निसर्गाच्या कुशीत असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे. 

संबंधित बातम्या -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: History of Tanaji Malusare