राखी धनेश पक्ष्यांचा माणसांना धडा, विणीच्या हंगामात चार महिने लॉकडाऊन

Aurangabad News
Aurangabad News

माणूस निसर्गाचाच अविभाज्य भाग आहे. जागतिकीकरण आणि उत्तर आधुनिक कालखंडात बदलेल्या जीवनशैलीने माणूस निसर्गापासून तुटला आहे. नैसर्गिक संसाधनांची कत्तल करून यांत्रिकीकरण, तंत्रज्ञान, वेगावर आरुढ झाला आहे. जैविक साखळी खंडित होऊन सूक्ष्मजीव जंतू उठाव करत आहेत. कोरोना या विषाणूने सगळ्या जगाला स्तब्ध करून लॉकडाऊन होण्यास बाध्य केले आहे. माणूस सोडून इतर सजीव निसर्गाचे नियम समजून घेऊन त्यानुसार जगतात. 

पक्षी निरिक्षक व अभ्यासक राजेश ठोंबरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की राखी धनेश पक्ष्याची जीवनशैली माणसाला प्रेरणादायी आहे. चाळीसगावच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारातच एका निंबाच्या झाडावर या पक्ष्याचा विणीचा हंगाम सध्या सुरू आहे. या पक्ष्याचे शास्त्रीय नाव टॉकस बायरोस्ट्रीस आहे. इंग्रजी भाषेत त्याला हॉर्नबील असेही संबोधतात.

मोठ्या धनेश पक्षाची लांबी सुमारे 60 सेंटिमीटर एवढी असते. वरचा भाग तपकिरी करड्या रंगाचा असतो. शेपटी लांब व टोकाला निमूळती असते. रंग तपकिरी असतो. चोच मोठी, बाकदार व दोन्ही बाजूंनी चपटी, काळी असते. तिच्यावर टोकदार नळकांड्यासारखे शिरस्त्राण असते. पायाचा रंग काळा असतो. त्याचा आवाजही वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

ट्रक सुरू होतांना जसा आवाज होतो तसा काहीसा याचा आवाज आहे. उडताना त्याच्या पंखांचाही मोठा आवाज होतो तो दूरपर्यंत ऐकू येतो. उडताना विशिष्ट शीळही घालतो. झाडांवर स्वस्थ न बसता ओरडून गोंगाट घालण्याचा त्याचा स्वभाव आहे. याचा अधिवास जंगलात व विशेष दाट नसलेल्या झाडांच्या परिसरात उंच,मोठ्या जुनाट झाडांवर असतो. परस बागेत आणि गावालगतच्या झाडांवरही त्याचे वास्तव्य आढळते.

असा असतो विणीचा हंगाम

साधारणतः डिसेंबर ते जानेवारी महिन्यात घर शोधण्याच्या मोहिमेवर ते निघतात. झाडांचे निरिक्षण करतात. झाडाच्या ढोलीची पाहणी करून तेथे घरटे करण्याचे निश्चित करतात. चिखल आणि आपल्या लाळेने ती ढोली लिंपून काढतात. मादी घरट्यात जाऊन बसते. मग केवळ मादी व पिलांना अन्न, पाणी देता येईल एवढीच एक लहान उभी भेग उघडी ठेवण्यात येते. संपूर्ण घर लाळ व मातीने बंद करण्यात येते. या घरट्यात मादी अंडी घालून उबवते. तब्बल चार महिने मादी धनेश स्वतःला क्वारन्टाईन करुन घेते.

या चार महिन्यांच्या काळात नर धनेश खड्तर कष्ट घेतो.

क्वारन्टाईन झालेल्या मादीच्या व पिल्लांच्या भरणपोषणाची जबाबदारी त्याच्यावरच असते. या काळात मादीला चांगले प्रोटीन मिळावे, यासाठी तो २० प्रकारची फळं शोधून आणतो. फायकस कुळातील झाडांची फळे या पक्षांना फार आवडतात. वड, पिंपळ, उंबर ही फळे विशेषतः जास्त प्रमाणात आवडतात. 

माणसांनी या झाडांवरही मोठ्या प्रमाणात कुऱ्हाड चालवल्यामुळे आता ही झाडेही विरळ झाली आहेत. त्यामुळे धनेश पक्ष्याला जास्त दूर जाऊन यातायात करावी लागते. तसा हा पक्षी मिश्राहारी आहे. पण बऱ्याच घरांत आठवड्यातून एखाद्याच दिवशी मटण, चिकनचा बेत होतो, तसाच चव बदल म्हणून ते किडे, सरडे, पाली यांची शिकार करतात. जास्त प्रमाणात फळेच खातात.

उंबरं, वडाची व इतर फळे आणण्यासाठी त्याला वणवण भटकावे लागते. स्वतःसह मादी, पिल्ले यांनाही खाद्य आणावे लागते. साहजिकच आहे त्याला बाजारही मोठाच करावा लागतो. त्यामुळे निसर्गाने त्याला मानेच्या खाली विशिष्ट पिशवी दिलेली आहे. यात तो फळं भरतो. घरट्याजवळ आल्यानंतर तो मानेला विशिष्ट झटका देतो. त्यामुळे पिशवीतील फळे वर येतात आणि मादी, पिल्ले त्यावर ताव मारतात. अन्नासोबत यांना पाण्याचीही गरज असते. त्यामुळे एखाददुसरी खेप त्याला पाण्याचीही घालावी लागते. या मानेखालील पिशवीत तो पाणीही घेऊन येतो.

घरट्याजवळ घाण नाही

दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत दिवसभरात नर धनेश पक्षाला जंगल ते आपले घर, अशा किमान पन्नास ते साठ फेऱ्या माराव्या लागतात. एवढ्यावरच हे श्रम थांबत नाहीत. वेळोवेळी घरट्याची स्वच्छताही करावी लागते. मादी विष्ठा गोळा करून त्याला देते. ती घेऊन तो घरट्यापासून दूर अंतरावर नेऊन टाकतो.

घरातील विष्ठा व कचरा त्याच झाडाखाली पडू न देण्याची खबरदारीही त्यांना घ्यावी लागते. घरटं असलेल्या त्याच झाडाखाली, बुंध्याशी विष्ठा, कचरा पडला तर साप, मांजर व इतर शत्रूंना सुगावा लागू शकतो. यासाठी विष्ठा, कचरा दूर नेऊन टाकावा लागतो.

या विणीच्या हंगामात आपला वंश पुढे चालावा, यासाठी मादीला क्वारन्टाईन करून नर धनेश मोठे कष्ट घेतो. यासाठी त्याला घराबाहेर रहावे लागते. या काळात बाहेर पडलेल्या नर धनेशाचे काही बरे वाईट झाले, तर एक-दोन दिवस वाट पाहून मादी घरट्यातून बाहेर पडते. खाद्यपदार्थ गोळा करून पिलांना जगवते.

चार महिन्यानंतर पिल्ले जन्माला येतात. नंतर नर धनेशाचे कष्ट अधिकच वाढतात. पाणी, अन्नपदार्थ जास्त प्रमाणात आणावे लागतात. घरट्यात अधिक कचरा, विष्ठा जमा होते, पण नर, मादी दोघेही नियमित घराची स्वच्छता राखतात. पिल्लांची पूर्ण वाढ झाल्यानंतर घरटे फोडून मादी व पिल्ले बाहेर पडतात.

चाळीसगाव येथील वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील एका झाडावर धनेश पक्षाच्या विणीचा हंगाम सध्या सुरु आहे. माणसाने या पक्ष्याकडून स्त्री-पुरुष समतेचा, श्रम वाटून घेण्याचा धडा तर घ्यावाच, पण काही काळ क्वारन्टाईनही करुन घेण्याची गरज आहे, हे ही शिकावे. लॉकडाऊन काळात पक्ष्यांना जगण्यासाठी मोकळा श्वास मिळाला आहे.

(छायाचित्र : धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक, चाळीसगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com