स्वप्नांवर अखेर विरजण, भुयारी मार्गावरच बोळवण!

Jalna Road News in Aurangabad
Jalna Road News in Aurangabad

औरंगाबाद : शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्याचे रुंदीकरण आवश्‍यक आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 400 कोटींची घोषणा केली होती. शिवाय या रस्त्यावर चार नवे उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग होऊन हा रस्ता पाश्‍चात्त्य देशांतील रस्त्यांप्रमाणे गुळगुळीत होईल, असे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात आता या रस्त्यासाठी केवळ 74 कोटी रुपये मिळणार असून, एवढ्या पैशातून केवळ चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर भुयारी मार्गच होणार आहे. परिणामी, या संपूर्ण रस्त्याचा मेकओव्हर होऊन अपघातांना आळा बसेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल, ही अपेक्षा बाळगून असणाऱ्या शहरवासीयांच्या स्वप्नांवर विरजण पडले आहे. 

 जालना रस्त्यांवरील दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी नितीन गडकरी यांच्या घोषणेप्रमाणे चारशे कोटींचा रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

चारशे कोटींच्या या बजेटमधून जालना रस्त्याला सर्व्हिस रोड, फुटपाथ, काही ठिकाणी ओव्हर ब्रिज, तर काही ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येणार होते; मात्र हे बजेट चारशेहून दोनशे कोंटीवर आले. त्यानंतर पुन्हा शंभर कोटी आणि आता 74 कोटींवर आले आहे. त्यातून चिकलठाणा विमानतळासमोर भुयारी मार्ग केला जाणार आहे. 


मागणी केवळ मागणीच राहणार 
या रस्त्यावरील शासकीय दूधडेअरी आणि आकाशवाणी चौकात भुयारी मार्ग गरजेचा आहे. तशी मागणीही होत आहे; पण ही मागणी आता केवळ मागणीच राहणार आहे. 

दाखविले होते हे स्वप्न 
नितीन गडकरी यांनी घोषणा केल्यानंतर 400 कोटींतून या रस्त्यावरील केंब्रिज ते छावणी पुलादरम्यान काम होणार होते. त्यातून आवश्‍यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे, वाहतूक पोलिसांसाठी विशेष कक्ष, भुयारी मार्ग, उड्डाणपूल, फुटपाथ, सायकल मार्ग, सिटी बससाठी वेगळा मार्ग, सरकते जिने, पार्किंग व्यवस्था या सुविधा दिल्या जाणार होत्या. एकूणच काय तर पाश्‍चात्त्य देशांतील रस्त्यांप्रमाणे या रस्त्याचे डिझाईन तयार करण्यात आले होते. शिवाय या कामांमुळे या रस्त्यावर शून्य अपघात होतील, असे स्वप्न शहरवासीयांना दाखविले गेले होते. प्रत्यक्षात हे सगळे आता कागदावरच राहणार आहे. 

मिळाली होती मंजुरीही 
 16 जुलै 2016 मध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जालना रोडवर केंब्रिज स्कूल, विमानतळ, आकाशवाणी आणि नगर नाका या चार ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे निश्‍चित केले होते. शिवाय धूत हॉस्पिटल आणि महर्षी दयानंद चौकात भुयारी मार्गाचे काम केले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले होते. 

काय म्हणाले होते गडकरी... (केंब्रिज शाळेजवळील मैदान, 25 डिसेंबर 2015) 

""तुमच्या एका मराठी वर्तमानपत्रात मी वाचले आहे, गडकरी घोषणाच करून राहिले आहेत. मी, पत्रकार बंधूंना विनंती करेन, माझी एक-एक घोषणा आपल्या डायरीत लिहून ठेवा आणि एकही घोषणा पूर्ण झाली नाही तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला मी तयार आहे. मी खोटे आश्वासनं कधी देत नाही. जे होण्यासारखे असेल तेच सांगेन आणि खरोखर या देशात काम करण्यासाठी पैशांची कमी नाही, तर इच्छाशक्तीची कमी आहे. म्हणून येत्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दीड लाख कोटी रुपयांचे रस्ते मी माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात बांधायचे ठरवले आहे; पण तुम्ही दरवेळा हे वाढवत नेता. अतुल सावे आले. म्हणाले, औरंगाबादचे रस्ते खराब आहेत, आज तुमच्या चिकलठाण्यापासून ते नगर नाक्‍यापर्यंत, ही जी लेंथ आहे 14 किलोमीटरची, हा सगळा रस्ता सिमेंट-कॉंक्रिटचा 400 कोटी रुपये खर्चून करून देण्याचे आम्ही ठरवले आहे. मग ते आले बीड बायपासला, या 9.6 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 250 कोटी मंजूर केले आहेत. आता हरिभाऊ बागडे म्हणतात, दोन पूल बांधा, म्हटलं या रस्त्यावर असेल तर तेही बांधून देईन.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com