सोमवारपासुन शिथीलता मिळण्याची शक्यता 

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामीण भागात यापूर्वीच सर्व उद्योग, व्यवसायांसह दुकाने, आठवडी बाजार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शहर परिसर अजूनही रेड झोनमध्ये कायम आहे. त्यामुळे येथील शिथिलतेबाबत अद्याप कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही, परंतु १ जूनपासून शहर परिसरातही मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णय येत्या शनिवारी (ता.३०) जाहीर होईल, असे गुरुवारी (ता.२८) जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी संकेत दिले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह जनजागृती तसेच जिल्हा प्रशासनाच्या कामाची माहिती देण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी चौधरी यांनी 'सोशल मिडीयावरून नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. सलग दोन महिन्यांपासून विविध समस्यांचा सामना करणाऱ्या नागरिकांनीही जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रारंभी शहरातील सध्य स्थितीची माहिती दिली.

ते म्हणाले की, शहरात सुरुवातीला रुग्ण कमी होते. परंतु अचानक त्यात वाढ झाल्याने आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर वेळीच योग्य उपाययोजना केल्या. आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांच्याही पुढे जाऊन मनपाने कोव्हीड टेस्ट केल्या. या प्रक्रियेमुळे रुग्ण शोधण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे विषाणू प्रादुर्भावाची साखळी तोडण्यास मदत झाली. बाधितांच्या संपर्कातील रुग्णांची माहिती कळताच त्यांच्यावर योग्यवेळी उपचार केला.

केवळ याच कारणामुळे सध्या रुग्ण संख्या घटली आहे, असा दावाही जिल्हाधिकारी चौधरी यांनी केला. मात्र रुग्ण संख्या वाढल्याने शासनाने संपूर्ण औरंगाबाद जिल्हाच रेड झोनमध्ये टाकला होता, परंतु नुकताच हा निर्णय मागे घेत शासनाने ग्रामीण भागाला रेड झोनमधून वगळले. सध्या शासन आदेशानुसार ग्रामीण भागात तालुकांतर्गत बससेवेसह सर्व प्रकारची दुकाने सुरू झाली आहेत. बांधकाम साहित्य विक्रीसाठी कुणाच्या परवानगीची आवश्यकता नाही. तसेच आपले सरकार आणि आधार व महा ई सेवा केंद्रही सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागाप्रमाणेच शहरातही लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणार का, १ जूनपासून सर्व प्रकारची दुकाने खुली होणार आहे का, चष्म्याच्या दुकानांसह डोळे तपासणीला अत्यावश्यक सेवेत का समाविष्ट केले नाही यासह इतर प्रश्नांचा समावेश होता. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले शहर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे अद्याप जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसह इतर कोणत्याही दुकानांना परवानगी दिलेली नाही. मात्र १ जूनपासून यात शिथिलता मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत शासनाद्वारे शनिवारपर्यंत सूचना येतील. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे. शहराचे सर्व निर्णय हे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त हेच घेतील, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. 

एसटी सेवेचीही शक्यता 
जिल्ह्यात तालुकाअंतर्गत एसटी बससेवा सुरू झाली आहे, परंतु एका तालुक्यातून दुसऱ्या ठिकाणी. तसेच शहरातून संपूर्ण जिल्हाभरात एसटी केव्हा धावणार, असा सवाल एका नागरिकाने उपस्थित केला होता. त्यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, येत्या १ जूनपासून ही सेवा सुरू होण्याची दाट शक्यता आहे, शासनस्तरावर तशा हालचाली सुरू आहेत. निर्णय येताच एसटी सेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले. 

मद्य विक्रीला लवकरच परवानगी 
रेड झोनमधील इतर शहरांत मद्यविक्रीला परवानगी आहे, शहरात का नाही असा सवाल एकाने उपस्थित केला होता. त्यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, इतर शहरांनी मद्यविक्रीला परवानगी दिली. त्यामुळे मद्य खरेदीला तेथे मोठ्या प्रमाणत गर्दी झाली. हा प्रकार धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळेच शहरात आतापर्यंत मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली नाही, परंतु लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यामुळे मद्यप्रेंमींना दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com