हवेत गोळीबार करीत लुटण्याचा प्रयत्न, मजुरांनी धाव घेतल्याने व्यापारी बचावला

सुभाष होळकर
Monday, 9 November 2020

कार अडवून शेतकरी व व्यापारी असलेल्या एकाच्या अंगावर मिरची पूड फेकत, पिस्तुलातून हवेत चार गोळ्या झाडून तिघांनी लूटण्याचा प्रयत्न केला.

शिवना (जि.औरंगाबाद) : कार अडवून शेतकरी व व्यापारी असलेल्या एकाच्या अंगावर मिरची पूड फेकत, पिस्तुलातून हवेत चार गोळ्या झाडून तिघांनी लूटण्याचा प्रयत्न केला. सात ते आठ मजूर मदतीला धावल्याने शेतकरी बचावला. शिवना (ता.सिल्लोड) येथील शिवना- खुपटा जुन्या रस्त्यावर रविवारी (ता. आठ) सायंकाळी सहाच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. येथील व्यापारी अखिलेश सुधीर गुप्ता यांचे मुख्य बाजारपेठेत श्रीराम कलेक्शन व शिवाई कृषी उद्योग हे व्यापारी प्रतिष्ठान आहे.

त्यांची  खुपटा शिवारात सुमारे पन्नास एकर क्षेत्रात बागायती आहे. अखिलेश गुप्ता हे शेती तर त्याचे दोघे भाऊ व्यवसाय सांभाळतात. नेहमीप्रमाणे शेतातील कामे आटोपून रविवारी सायंकाळी आपल्या कारने घरी निघाले. त्यावेळी झाडाझुडुपात लपलेल्या तिघांनी त्यांची कार अडवली व पिस्तूल रोखले. गुप्तांची साखळी, अंगठ्या हिसकावण्याच्या प्रयत्नात झटापटीत त्यांनी पिस्तुलातून हवेत चार राऊंड फायर केले.

कंगना राणावतच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रकरण

गोळ्यांचा आवाज व गुप्तांनी केलेली आरडाओरड ऐकून शेतातील सात ते आठ मजूर धावले. त्यामुळे संशयितांनी पोबारा केला. काही मजुरांनी दोन किलोमीटरपर्यंत, आडगाव भोंबे (ता.भोकरदन) गावापर्यंत त्यांचा पाठलाग केला; पण हल्लेखोर पसार होण्यात यशस्वी झाले. अजिंठ्याचे सहायक पोलिस निरीक्षक गिरीधर ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता.

तीनच दिवसांपूर्वी चौकशी
येथील जिल्हा परिषद प्रशालेजवळील छत्रपती संभाजी चौकात तिघा संशयितांनी अखिलेश गुप्ता यांची दुचाकी थांबवून शिवन्यात किशोर काळे कोण आहे, अशी विचारणा केली होती. त्यातील एकाचा चेहरा त्यांच्या लक्षात आहे. रविवारी हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. तरी देहबोलीवरून एकाचा चेहरा माझ्या लक्षात आहे, असे गुप्ता यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looters Fired In Air For Looting Aurangabad News