
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीस सोमवारपासून (ता.आठ) सुरुवात होत आहे
औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील सुनावणीस सोमवारपासून (ता.आठ) सुरुवात होत आहे. जयश्री पाटील (सदावर्ते) विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी कोर्ट नंबर सातमध्ये होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.
गेल्या पाच फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेल्या वेळापत्रकानुसार ता. आठ, नऊ व दहा मार्च हे तीन दिवस आरक्षणाच्या विरोधकांना, ता.१२, १५, १६ व १७ मार्च हे चार दिवस मुख्यमंत्री, मुख्य सचिव, याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने लढणारे वकील व इतर सर्व मराठा आरक्षणाचे समर्थक यांना आपली बाजू मांडण्यासाठी असतील.
औरंगाबादसह जिल्ह्यात ११ मार्चपासून अंशतः लाॅकडाऊन; फक्त रजिस्टर मॅरेजला परवानगी...
यासोबतच १८ मार्चचा दिवस केंद्र सरकारला तामिळनाडूचे आरक्षण, EWS चे आरक्षण व यामध्ये असलेली मर्यादा या सर्व मुद्यांवर आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. याविषयी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, की आठ तारखेपासून सुरू होणाऱ्या सुनावणीसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झालेले आहे व ते आता कायद्याच्या चौकटीमध्ये देखील टिकेलच याचा मला पूर्ण विश्वास आहे.