या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले 'तान्हाजी'त बदल 

विकास देशमुख
Saturday, 11 January 2020

तान्हाजी चित्रपटात निर्माते अजय देवगण यांनी काही सूक्ष्म बदल केले. त्यासाठी त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ. शीतल मालुसरे (रा. महाड, जि. सिंधुदुर्ग) यांचा सल्ला घेतला.

औरंगाबाद - नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित तान्हाजी चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील कथा ते नावापर्यंत निर्माते अजय देवगण यांनी काही सूक्ष्म बदल केले. त्यासाठी त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ. शीतल मालुसरे (रा. महाड, जि. सिंधुदुर्ग) यांचा सल्ला घेतला. शीतल या शिक्षिका असून, त्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्यावर पीएच. डी. केलेली आहे. शिवाय तान्हाजी यांच्या पराक्रमावर त्या व्याख्यानही देतात. 

तान्हाजी की तानाजी? 
चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे नाव 'तान्हाजी' की 'तानाजी?' असा प्रश्न उपस्थित झाला होता. काही इतिहासप्रेमी तानाजी, तर काही तान्हाजी असे सांगत होते. त्यामुळे चित्रपटाचे नाव नेमके काय असावे, असा प्रश्न निर्माता अजय देवगण यांना पडला होता. दरम्यान, निर्मात्यांनी तान्हाजी मालुसरे यांच्या वशंज डॉ. शीतल मालुसरे यांचा याबाबत
सल्ला घेऊन 'तान्हाजी मालुसरे' हेच नाव बरोबर असल्याचे सांगितले. त्यामुळे चित्रपटालाही 'तान्हाजी' असेच शीर्षक देण्यात आले. 

Image may contain: 7 people, people smiling, people standing and outdoor
अजय देवगण यांच्यासोबत मालुसरे कुटुंबीय.

...म्हणून 'तान्हाजी' हेच नाव बरोबर 
डॉ. शीतल मालुसरे सांगतात, की छत्रपती शिवरायांनी नरवीर तान्हाजींच्या पार्थिवावर ठेवलेली समुद्रकवड्यांची ऐतिहासिक राजमाळ यासंदर्भातील दाखले दर्शविते. कोंढाण्याची मोहीम फत्ते करताना बक्षीस देण्याचे ठरविलेली समुद्रकवड्यांची राजमाळ तान्हाजींच्या पार्थिवावर ठेवून "गड आला; पण माझा सिंह गेला.. तान्हा गेला," असे भावुक उद्‌गार शिवरायांनी काढले होते.
त्यामुळे तान्हाजी हेच नाव बरोबर आहे, अशी माहिती इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या डॉ. शीतल यांनी दिली.

वाशीम येथील मराठीचे प्राध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघ यांनीही याला दुजोरा दिला. प्रा. वाघ म्हणाले, "तान्हाजी वेगळा शब्द नाही. तान्हा, तान्हे या मूळ शब्दांवरून तान्हाजी हा शब्द तयार झाला. व्यक्तीचे नाव असल्याने त्याला शेवटी जी लावले गेले. हिंदू-उर्दूमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तिच्या नावापुढे जी हे विश्लेषण लावले जाते. या भाषांचा प्रभाव मराठीवरही दिसून येतो.'' 

घोरपडीचा प्रसंगही वगळला 
घोरपडीच्या मदतीने तान्हाजी मालुसरे गड सर करतात, असा प्रसंग चित्रपटात होता. मुळात घोरपडीच्या मदतीने नव्हे, तर स्वतः नरवीर तान्हाजी मालुसरे यांनी गड सर केला होता; पण काही इतिहासकारांनी चुकीची नोंद घेऊन घोरपड घुसवली, हे डॉ. शीतल यांनी संदर्भासह चित्रपट निर्मात्यांच्या लक्षात आणून दिले. त्यामुळे चित्रपटातून घोरपडीचा प्रसंग वगळून तान्हाजी स्वतः गड सर करतात हे दाखविले. 
 
संबंधित बातम्या -
 

या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Information TANAJI Film