गुरुवारी राज्यात विभागीय परीक्षा मंडळावर मोर्चे 

संदीप लांडगे
Tuesday, 21 January 2020

  • विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांचा एल्गार 
  • प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा कामकाज व पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार असल्याचे निवेदनही देण्यात येणार

औरंगाबाद- राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांना शासननिर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागांत असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शाळा कृती संघटनेतर्फे मोर्चे काढून आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षा कामकाज व पेपर तपासणीच्या कामकाजावर बहिष्कार असल्याचे निवेदनही देण्यात येणार असल्याचे संघटनेचे औरंगाबाद विभागप्रमुख प्रा. संघपाल सोनोने यांनी सांगितले. 

13 सप्टेंबर 2019 रोजी राज्यातील 1,638 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित करण्यात आली. शिवाय यापूर्वी 28 फेब्रुवारी 2018 रोजी 146 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये अनुदानास पात्र घोषित करण्यात आली होती. 13 सप्टेंबर 2019 रोजी निर्गमित झालेल्या शासननिर्णयानुसार राज्यातील पात्र घोषित विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांना 1 एप्रिल 2019 पासून सरसकट 20 टक्के अनुदान दिले जाईल व त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनात केली जाईल, असा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे उपाशीपोटी काम करणाऱ्या उच्च माध्यमिक शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; परंतु हिवाळी अधिवेशनात अनुदानाची तरतूद न झाल्याने शिक्षकांचा भ्रमनिरास झाल्याची भावना प्रा. संघपाल सोनोने यांनी व्यक्त केली. 

शासन निर्णयानुसार अर्थ खात्याने मागविलेल्या माहितीत कनिष्ठ महाविद्यालयांचा सलग तीन वर्षांतून एकदा शंभर टक्के निकाल असावा, अशी जाचक अट घालण्यात आली आहे. राज्यात अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अशी कोणतीही अट नसताना विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा अनुदानावर आणताना ही अट का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे 100 टक्के निकालाची अट रद्द करावी व शासन निर्णयानुसार 1 एप्रिल 2019 पासून 20 टक्के अनुदान वितरित करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करून नैसर्गिक टप्पावाढ अनुदानाच्या तरतुदीचा शासन आदेश जारी करावा.

या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षांचे साहित्य स्वीकारले जाणार नाही व प्रात्यक्षिक परीक्षा व बोर्ड परीक्षांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली. राज्याध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी, उपाध्यक्ष प्रा. राहुल कांबळे, राज्य कार्याध्यक्ष प्रा. संतोष वाघ, राज्य सचिव प्रा. अनिल परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चे निघणार आहेत. 

सहभागाचे आवाहन 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभाग औरंगाबाद या ठिकाणच्या मोर्चात सर्व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय अध्यक्ष संघपाल सोनोने, विभागीय सचिव बाबासाहेब नागरगोजे, विभागीय संघटक प्रा. दगडुबा पवार, ज्ञानेश्वर मुंडे, प्रा. संजय देवकर, प्रा. अष्टपाल सिरसाट, बीड जिल्हाध्यक्ष राजेश गीते, परभणी जिल्हाध्यक्ष रविकांत जोजारे, हिंगोली जिल्हाध्यक्ष आशिष इंगळे, जालना जिल्हाध्यक्ष रमेश शेळके, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण, सिद्धार्थ कुलकर्णी यांनी केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A march on the divisional examination board in the state on Thursday