परवानगी द्या, अख्ख्या मतदारसंघाला महिनाभराचा किराणा पुरवतो

प्रकाश बनकर
बुधवार, 1 एप्रिल 2020

शासनाचा एक रुपयाही न घेता मी माझ्या मतदारसंघात महिनाभर किराणा साहित्य पुरवतो. तुम्ही फक्त परवानगी द्या, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

औरंगाबाद : शासनाचा एक रुपयाही न घेता मी माझ्या मतदारसंघात महिनाभर किराणा साहित्य पुरवतो. तुम्ही फक्त परवानगी द्या, अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले, की कोरोनामुळे देशात लॉकडाऊन आहे. तथापि, जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना घराबाहेर पडावेच लागते. यामुळे किराणा खरेदीसाठी दुकानांवर गर्दी होत आहे. सध्या काम बंद असल्याने नागरिकांकडे खर्च करण्याची परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे गरजू लोकांना किमान एक महिना मदत करावी लागणार आहे. यासाठी मी प्रतिव्यक्तीस एक महिन्याचा किराणा साहित्य पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन तयार केले आहे. 

माझ्या मतदारसंघात जवळपास साडेसहा लाख लोकसंख्या आहे. जवळपास तीन लाख ७० हजार रेशनधारक आहेत. अंदाजे ४० ते ५० हजार स्थलांतरित असून, त्यांना रेशन मिळत नाही. यामुळे एकूण लोकसंख्येपैकी जवळ तीन ते साडेतीन लाख लोकांना या आपत्कालीन परिस्थितीमध्ये किमान एक महिना पुरेल इतके साहित्य घरपोच देणे अत्यंत आवश्यक आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ही सुविधा मी शासनाचा एक रुपयाही न घेता आमदार निधी, गंगापूर नगर परिषद, खुलताबाद नगर परिषद, मतदारसंघातील ग्रामपंचायती व मतदारसंघातील दानशूर व्यक्तींकडून जमा होणाऱ्या निधीतून भागवणार आहे.

असा उभा राहील निधी 

  • २०२०-२१ आमदार निधीतून दोन कोटी रुपये 
  • गंगापूर नगर परिषदेकडून दोन कोटी रुपये 
  • खुलताबाद नगर परिषदेकडून एक कोटी रुपये 
  • ग्रामपंचायतीनुसार प्रत्येकी एक ते २५ लाख (असे तीन कोटी रुपये) 
  • मतदारसंघातील दानशूरांकडून चार कोटी रुपये

यात प्रतिव्यक्तीस ५०० ते ६०० रुपयांच्या किराणा साहित्याची किट घरपोच देण्याचे नियोजन केले आहे. मतदारसंघातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने एक कार्यकर्ता किमान बारा घरी ५० नागरिकांना थेट किराणा पोचवेल, अशी व्यवस्था केली आहे. यासाठी अतिरिक्त निधी देण्याची गरज नाही.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या निधीतून याचे नियोजन केले आहे. उपरोक्त निधी वापरल्यामुळे थांबलेली विकासकामे पुढील वर्षीच्या नियोजनातून मार्गी लावता येतील. या किराणा निधीचा सर्व तपशील प्रत्येक लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमांकासह शासनाला सादर केला जाईल, असेही आमदार प्रशांत बंब यांनी निवेदनात म्हटले आहे. 


    स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
    Web Title: MLA Prashant Bamb Wrote Letter To CM Uddhav Thackeray