सोमवारी काय होणार... संचारबंदी लागणार का...? शहरवासीयांचे लागले लक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

औरंगाबाद शहरात संचारबंदी लागणार का, निर्णय झाला तर कधीपासून लागणार, याविषयी सोमवारी प्रशासन काय निर्णय घेणार, याची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे. शहरात दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे वाळूजप्रमाणेच शहरातही संचारबंदी लागू शकते, अशीही चर्चा आहे.

औरंगाबाद - कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विळखा शहरासोबतच ग्रामीणमध्येही घट्ट होत चालला आहे. त्यातच वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. वाळूजला ४ जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू होणार असल्याची चर्चा आहे. त्यादृष्टीने सोमवारी (ता. सहा) होणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीकडे अवघ्या शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

....म्हणून अमेरिका, ब्राझील अन् युरोपात कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक

कर्फ्यू लागला तर कडक असेल
शहराचे परिस्थितीबाबत सोमवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, मनपा, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक होईल. त्यानंतर लॉकडाउन, कर्फ्यू, संचारबंदीचा निर्णय होईल, असे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शुक्रवारी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. संचारबंदी, लॉकडाउनने कोरोनावर पूर्ण नियंत्रण शक्य नाही; परंतु रुग्णसंख्येला आळा बसू शकतो. तसेच सोमवारपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची परिस्थिती आटोक्यात आली नाही तर कर्फ्यू लावावा लागेल आणि हा कर्फ्यू साधारण नसेल, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विनाकारण घराबाहेर न पडणे, कामानिमित्ताने बाहेर आल्यावर तोंडाला मास्क लावणे, विनाकारण कुठेही हात लावू नये, असे सांगूनही लोक ऐकत नसल्यामुळेच प्रशासन पुन्हा संचारबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत सोमवारी काय निर्णय होतो, संचारबंदी लागेल का, कधीपासून लागेल, त्याचे स्वरूप काय असेल, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

स्थानिक प्रशासनाला अधिकार
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत दररोज ५० रुग्ण आढळले तरी लॉकडाउन केले जात आहे, मग औरंगाबादला रोज २०० रुग्ण आढळले तरी याबाबत विचार का होत नाही? विभागातील जिल्ह्यांचे पूर्ण अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. परभणी, बीड आणि औरंगाबादची तुलना शक्य नाही. कारण औरंगाबादेत त्या जिल्ह्यांपेक्षा सुविधा अधिक आहेत. शहरात अचानक संचारबंदीचा निर्णय लागू करण्याऐवजी जनजागृती करून विचार होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monday's administration's decision caught the attention of citizens