तीन महिन्यांचे गोंडस बाळाला सोडून मातेने रुग्णालयातून काढला पळ

सुषेन जाधव
Sunday, 11 October 2020

आजारी असलेल्या तीन महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडून एका मातेने घाटी रुग्णालयातून पळ काढल्याची संतापजनक घटना रविवारी (ता.११) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली.

औरंगाबाद : आजारी असलेल्या तीन महिन्यांच्या गोंडस बाळाला सोडून एका मातेने घाटी रुग्णालयातून पळ काढल्याची संतापजनक घटना रविवारी (ता.११) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. तपासासाठी आलेल्या बेगमपूरा पोलिसांना मात्र घाटी प्रशासनाने सहकार्य केले नाही.

पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, दोघांचा अपघातात मृत्यू

घाटी रुग्णालयात रविवारी सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास एक २५ ते ३० वर्षे वयोगटातील महिला वॉर्ड क्र. २४ मध्ये बाळाला उपचारासाठी घेऊन आली होती. बाळ रडत असल्याने महिलेने एका व्यक्तीला बाळाकडे लक्ष देण्याचे सांगितले. त्यावरून त्या व्यक्तीने बाळाकडे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, उशीर होत असल्याने त्याने घटनेची माहिती घाटी प्रशासनाला दिली. त्यावरून महिला सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले.

दोन चोरट्यांना अटक, दीड लाख रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त

एक तास उलटला तरी महिला आली नसल्याने सुरक्षा रक्षकांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. बाळ रडत असल्याने महिला सुरक्षा रक्षकांनी बाळाला घाटीतील २४ नंबर वॉर्डात उपचारासाठी दाखल केले. साडेतीन वाजेपर्यंत महिला घाटीत न परतल्याने घाटी प्रशासनाने घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

घाटी प्रशासनाची टोलवाटोलवी
मातेने बाळाला सोडून पळ काढल्याची माहिती मिळताच बेगमपूरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचे सांगितले असता तेथील डॉक्टरांनी वरिष्ठांच्या नावाने अर्ज करा, त्यानंतर फुटेज देण्यात येईल, असे सांगितले. घाटी प्रशासनाने पोलिसांना सहकार्य केले असते तर निदेर्यी मातेचा शोध लागला असता, असे घाटी वर्तूळात बोलले जात होते.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother Left Three Months Baby In Hospital Aurangabad News