ज्यांना पाच दहा मते पडली अशांनी तिकीटे मागू नये

ज्यांना पाच दहा मते पडली अशांनी तिकीटे मागू नये

औरंगाबाद : मागील महापालिका निवडणुकीत काही जणांना पाच ते दहा मते पडली. कार्यकर्ते असले तरी अशा लोकांना येत्या महापालिका निवडणुकीत तिकीट द्यायचे का? अशा लोकांनी तिकीट मागू नये. निवडणूक लढण्याची, विजयी होण्याची क्षमता पाहिजे, थोडाफार हातभार पक्ष लावेल, असे स्पष्ट शब्दांत कॉंग्रसचे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांनी रविवारी (ता.19) गांधी भवनमध्ये झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत उपस्थितीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सुनावले.

बैठकीला जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, कार्याध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. कल्याण काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, मोहसीन अहेमद, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष डॉ. अरुण शिरसाट, रवींद्र काळे, महिला जिल्हाध्यक्ष सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील, पृथ्वीराज पवार, चंद्रभान पारखे, इब्राहिम पठाण, इकबालसिंग गिल, मुजफ्फर खान, गौरव जैस्वाल, सय्यद अक्रम, गटनेते भाऊसाहेब जगताप, नगरसेविका सायली जमादार यांची उपस्थिती होती. 

नेत्यांची संख्या जास्त, कार्यकर्ते कमी 

पवार म्हणाले, पाच वर्षांत गेस्टहाऊस आणि एअरपोर्टवर स्वागत करणाऱ्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीची अपेक्षा करू नये. काही तर असे आहेत, की दुसऱ्यांच्या मंत्र्यांचे सत्कार करीत होते. माझ्याकडे गेल्या पाच वर्षांची फाइल आहे. कॉंग्रेसमध्ये नेत्यांची संख्या जास्त असून, कार्यकर्ते कमी झाले आहेत. भाषणही करता येत नाही, असे लोक व्यासपीठावर गर्दी करतात; पण आता असे चालणार नाही. सकाळी एमआयएमच्या तंबूत, दुपारी कॉंग्रेसमध्ये तर सायंकाळी एमआयएमकडे असेही अनेक कार्यकर्ते आहेत.''

नेत्यांना वॉर्डाची जबाबदारी 

प्रत्येक नेत्यांना त्या-त्या वॉर्डातून उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात येईल. 21 जानेवारीनंतर इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येतील, त्या-त्या वॉर्डात संबंधित उमेदवाराच्या संदर्भात सर्व्हे केला जाईल, त्याचे रेटिंग तपासले जाईल, त्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल, शहरात एमआयएमचे प्राबल्य आहे, ही मानसिकता डोक्‍यातून काढून टाका, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा : संतापजनक : चालक अन् दोन मुले गतिमंद मुलीशी बसमध्येच करायचे गैरप्रकार

महाआघाडी नको; स्वतंत्रपणे लढावे : डॉ. काळे 

राज्यात महाआघाडीचे सरकार असले तरी आपण महापालिकेची निवडणूक महाआघाडीसोबत न लढता स्वतंत्रपणे लढावी. सर्वच्या सर्व जागा लढवाव्यात. निवडणुकीनंतर महाआघाडी करावी. स्वतंत्र लढल्यास आपली ताकद दिसून येईल. लोकांची कामे करणाऱ्यांना लोक मत देतात. एमआयएम बेल्टमधील लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करा, असे डॉ. कल्याण काळे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com