वेध निवडणुकीचे : सत्तेसाठी एकत्र, बिनसले तर विरोधात!

News About AMC
News About AMC

औरंगाबाद - महापालिकेत सत्तेसाठी एकत्र येत गेली 25 वर्षे शिवसेना-भाजप युतीने सत्ता उपभोगली. पदे घेताना गळ्यात गळे घालून फिरणारे पदाधिकारी युती तुटल्यानंतर आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. वर्ष 1988 ते 2020 या काळात शिवसेनेने तब्बल 14 वेळा महापौरपद उपभोगले आहे, तर भाजपकडे चारवेळा म्हणजेच साडेपाच वर्षे महापौरपद होते. महापालिकेत आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समितीमध्ये देखील दोन्ही पक्षांचा वाटा समान राहिला आहे. मात्र, आता आगामी महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष जनतेची दिशाभूल करण्यासाठी तयारीला लागले आहेत. 
 
प्रत्येकवेळी भावनिक मुद्दे 

महापालिकेत काही अपवाद वगळता वर्ष 1988 पासून आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहे. निवडणूक आली, की "औरंगाबाद की संभाजीनगर' असा भावनिक मुद्दा प्रत्येकवेळी पुढे केला जातो. त्यामुळे शहराच्या विकासाचे मुद्दे मागे पडतात व वर्षानुवर्षे त्याच त्या विषयांवर केवळ चर्चाच होत राहते. समांतर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहराला सात दिवस चोवीस तास पाणी देण्याचे आश्‍वासन जनतेला देण्यात आले. मात्र चोवीस तास नव्हे तर महिन्यातील चार दिवसच पाणी नागरिकांना मिळत आहे.

पुढे ही योजनाच गुंडाळण्यात आली. शहरातील ड्रेनेजलाइन जीर्ण झाल्या आहेत. मुख्य मलजलनिस्सारण वाहिनी खाम व सुखना नदीत जागोजाग फुटल्याने ड्रेनेजचे पाणी या नद्यांमधून वाहत होते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण तर वाढलेच मात्र नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तब्बल 464 कोटी रुपयांची योजना आणली. मात्र, 372 कोटींचे काम झाल्यानंतर ही योजना आहे त्या स्थितीत बंद करण्यात आली. त्यामुळे आजही शहरातील नाल्यांसह नद्यांमधून पाणी वाहतच आहे. महापालिकेची ऐपत नसताना 120 कोटी रुपयांची एलईडी योजना अशीच घाईगडबडीत मंजूर करण्यात आली. पुढे केंद्र शासनानेच देशभरातील शहरांमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 120 कोटींचा खर्च महापालिकेच्या डोईजड झाला. एवढा निधी खर्च केल्यानंतरही शहरातील पथदिव्यांचा प्रश्‍न कायम आहे. गळ्यात गळे घालून सत्तेची पदे भोगणारी शिवसेना-भाजप आता एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहेत. 

आतापर्यंतचे महापौर 

  1. डॉ. शांताराम काळे (कॉंग्रेस) 
  2. मोरेश्‍वर सावे (शिवसेना) 
  3. प्रदीप जैस्वाल (शिवसेना) 
  4. मनमोहनसिंग ओबेरॉय (कॉंग्रेस) 
  5. यादव अशोक सायन्ना (कॉंग्रेस) 
  6. सुनंदा कोल्हे (शिवसेना) 
  7. गजानन बारवाल (शिवसेना) 
  8. अब्दुल रशीद खान (मामू) (अपक्ष) 
  9. शीलाताई गुंजाळे (शिवसेना) 
  10. सुदाम सोनवणे (शिवसेना) 
  11. डॉ. भागवत कराड (भाजप) 
  12. विकास जैन (शिवसेना) 
  13. विमलताई राजपूत (शिवसेना) 
  14. रुक्‍मिणीताई शिंदे (शिवसेना) 
  15. किशनचंद तनवाणी (शिवसेना) 
  16. डॉ. भागवत कराड (भाजप) 
  17. विजया राहटकर (भाजप) 
  18. अनिता घोडेले (शिवसेना) 
  19. कला ओझा (शिवसेना) 
  20. त्र्यंबक तुपे (शिवसेना) 
  21. भगवान घडमोडे (भाजप) 
  22. नंदकुमार घोडेले (शिवसेना)   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com