#Youth_Inspiration : पक्ष्यांच्या आयुष्यात 'प्रकाश'

News About Bird friends Prakas Kulkarni
News About Bird friends Prakas Kulkarni

औरंगाबाद -  मुंबईच्या एका मित्राने पक्ष्यांचे कृत्रिम घरटे वाढदिवसाची भेट म्हणून दिले. ते घरटे गच्चीवर लावले. आजूबाजूला धान्य, पाणी ठेवले. ही छोटी कृती पक्ष्यांचा गच्चीवरील किलबिलाट करण्यास पुरेशी ठरली. पक्षी पाणी पिऊ लागले. धान्य खाऊ लागले. काही पक्ष्यांनी तर त्या घरट्यात आपला संसार थाटला. पिलांनाही जन्म दिला. या कृतीने प्रफुल्लित होऊन निसर्गमित्र प्रकाश कुलकर्णीने पक्ष्यांसाठी घरटे करण्याचा चंग बांधला. प्रकाशला मिळालेला आनंद आता मित्रपरिवार आणि शहरवासीयांना त्याच स्वरूपात देत आहे. 

प्रकाशने तेव्हापासूनच ठरवले, की वाढदिवसानिमित्त केक कापणे, हॉटेलला जाऊन वाढदिवस साजरा करणे बंद. ज्याचा वाढदिवस असेल, त्यांना भेट म्हणून पक्ष्यांचे घरटे द्यायचे. कृत्रिम घरटे मुंबई, पुणेमधून आणणे शक्‍य नव्हते, तर मग घरातील टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांचे घरटे बनवायला सुरवात केली. प्लायवूडच्या शीटपासून टिकाऊ व जास्त काळ टिकणारे घरटे
बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. पक्ष्यांचा अभ्यास करून तसे घरटे बनविण्याचे काम सुरू केले. शाळेतील मुलांसाठी कार्यशाळा घेतल्या. जेणेकरून मुलांना त्याची आवड निर्माण व्हावी आणि पक्ष्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे, हा उद्देश सफल होत आहे. 
 
पक्षी बनवताहेत घरट्यात घरटे 
उन्हामुळे चिमण्यासह सर्वच पक्ष्यांची होणारी तगमग प्रकाशला व्यथित करत होती. सिमेंटच्या घरामध्ये पक्ष्यांना घरटे तयार करता येत नाही आणि झाडांवर हवा पाण्यामुळे घरटी मोडतात, त्याकरिता अवतीभवती, गच्चीवर व झाडांवर कृत्रिम घरटे लटकवून त्यांना त्यांच्या हक्काचं घर देण्याच्या उपक्रमाला नऊ वर्षे सरली. प्रकाशने लावलेल्या घरट्यांमध्ये आता
पक्षी घर बनवत आहेत. सोबतच अंडी घालत आहेत. हा क्षण मनाला आनंद देणारा असल्याचे प्रकाश सांगतो. आपण योग्य मार्गावर असल्याची प्रचिती मिळत असल्याचेही तो स्पष्ट करतो.  

राज्यातून प्रशिक्षणाची मागणी 
ना नफा ना तोटा या तत्त्वावर औरंगाबादमध्ये लोकांना कृत्रिम घरटे बनविण्याचे व मुलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. जालना, नाशिकमधूनही त्यांची मागणी होऊ लागली. ज्यांना घरटे दिले, त्यांना धान्याची व्यवस्था व्हावी म्हणून मोंढ्यातून वापरात नसलेले धान्य आणून त्याचे वाटपही केले. जेणेकरून पक्ष्यांना धान्याची व्यवस्था व्हावी. फेसबुक,
व्हॉट्‌सऍप व इंटरनेटच्या माध्यमाने लोकांमध्ये पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे, पाणी व धान्य ठेवण्याचे आवाहन सतत करत असतो. 
 
पक्ष्यांचे कृत्रिम पाणवठे उपयुक्‍त 
एका कंपनीत कार्यरत असून, प्रकाश मिळालेल्या वेळेत हे पर्यावरणपूरक विविध उपक्रम राबवत असतो. डोंगरावर पक्ष्यांसाठी पाण्याची व धान्याची व्यवस्था व्हावी म्हणून कृत्रिम पाणवटे तयार करण्याची योजना प्रयास ग्रुपच्या सहकार्याने सुरू केली. ती आणखी वाढवण्याचे काम सुरू आहे. सध्या जखमी पक्ष्यांवर इलाज करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही, आता प्रकाश
त्यांच्यावर इलाज करण्याचेही प्रशिक्षण घेत आहे. 
  
पर्यावरणासाठी प्रकाशचे उपक्रम 

  •  मुलांना पेपर बॅग बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करणे. 
  •  बचतगटांच्या महिलांसाठी पेपर बॅग बनविण्याचे प्रशिक्षण घेणे. 
  •  मुलांना शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा घेणे. 
  • झाडांची रोपे तयार करून सुरक्षित जागी लावून त्यांना वाढवणे. 

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com