औरंगाबादमध्ये श्‍वानांना आता हक्काचा निवारा अन्‌ जेवणही

News About Dogs House
News About Dogs House

औरंगाबाद - शहरातील भटक्‍या श्‍वानांचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. हे श्‍वान वारंवार हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, तर दुसरीकडे अन्न-पाण्याविना श्‍वानांचे होणारे हाल पाहून काही तरुणांचे मन हेलावून गेले. बेवारस पाळीव प्राण्यांसाठी काहीतरी केले पाहिजे, या विचारातून एकत्र आलेल्या तरुणांनी श्‍वान, मांजराच्या पोटाची सोय लावली आणि त्यांना हक्काचा निवारा मिळवूनही मिळवून दिला. सध्या सुमारे 700 श्‍वानांच्या दोन वेळ जेवणाची व 150 श्‍वान व मांजरांच्या राहण्याची सोय तरुणांनी केली आहे. 

शहरातील मोकाट श्‍वानांचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महापालिकेने श्‍वानांची वाढती संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत हजारो श्‍वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या; मात्र श्‍वानांची संख्या व होणाऱ्या शस्त्रक्रिया यामध्ये मोठी तफावत आहे. म्हणून संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यात आक्रमक झालेले श्‍वान लहान मुले, वृद्धांवर हल्ले करीत आहेत. श्‍वानांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे बेवारस श्‍वान पाहिले, की नागरिकांचा थरकाप उडत आहे.

एकीकडे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना दुसरीकडे रस्त्यावर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या श्‍वानांसाठी 15 ते 20 तरुणांनी एकत्र येत त्यांच्या दोन वेळ जेवणाची व निवाऱ्याची सोय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दौलताबाद येथे एका फार्महाऊसवर 100 श्‍वानांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्‍वानांप्रमाणेच मांजरांसाठीदेखील चिकलठाणा येथे व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी श्‍वान, मांजरे यांच्यासाठी जेवण व निवाऱ्याची व्यवस्था झाली आहे. या मोहिमेत पुष्कर शिंदे, रोहित नांदूरकर शशांक डोंगर, डॉ. गौरांग पांडे, संध्या जोशी, प्रीती कनवाले, आदिती सोहनी, गणेश बेद्रे, अभिषेक शेजवळ, मनोज काळे, संध्या जोशी सहभागी झाल्या आहेत. 
  
15 हॉटेल्सचे सहकार्य, घरातून एक हजार रोटी 
श्‍वानांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम या युवकांनी सर्वांत प्रथम मोठ्या हॉटेलचालकांशी संपर्क केला. नॉनव्हेज हॉटेलमधील उरलेले अन्न, हाडे जमा केली जातात. हाडे गरम पाण्यात उकळून नंतर ती दौलताबाद ते महावीर चौक रस्ता, सिडको, औरंगपुरा, क्रांती चौक, सेंट्रलनाका रस्त्यावरील श्‍वानांना दिली जातात. तसेच घरोघरी जाऊन चपाती, भाकरीही जमा केल्या जातात. रोज सुमारे एक हजार रोट्या जमा करून त्या श्‍वानांना दिल्या जातात. 
 

सध्या आमच्याकडे प्राण्यांना राहण्यासाठी एक निवारागृह आहे. ज्यात कुत्रे, मांजर अशा 150 प्राण्यांचे पालनपोषण आम्ही करतो. शहरातील भटक्‍या प्राण्यांना अन्न-पाणी देण्यासाठी निधी जमा करण्याचे काम सुरू आहे. कुत्र्यांच्या खाद्यपदार्थांची होलसेल विक्रेत्यांकडील खरेदी किंमत 2300 रुपये प्रती 20 किलोग्रॅम आहे तर मांजराच्या खाद्यपदार्थांची किंमत 1,500 रुपये प्रती सात किलोग्रॅम आहे. पूर्ण वाढ झालेल्या एका कुत्र्याला दरमहा नऊ ते 10 किलोग्रॅम अन्न लागते, ज्याची किमत सुमारे एक हजार रुपये आहे. त्यासाठी दानशूरांनी मदत
करावी. 
- रोहित नांदूरकर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com