मिस कॉल दिला अन, काम झाले फत्ते! 

photo
photo

औरंगाबाद : वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या २३ दिवसांत राज्यातील ५३१६० वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर १५८३ वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे. 
महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. 

‘मिस्ड कॉल’ सुविधेचा वापर 

गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरु आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या २३ दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण १ लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणचे मोबाईल अॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे प्राप्त झाल्या. यापैकी ३८ टक्के म्हणजे तब्बल ५३१६० तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तर १५८३ तक्रारी ‘एसएमएस’ द्वारे नोंदविलेल्या आहेत. 

असे आहेत ग्राहक 

कल्याण परिमंडल- १०९२१, पुणे परिमंडल – ८७०४, भांडूप- ५४२६, नागपूर- ४८५२, नाशिक- ३९३९, कोल्हापूर- ३७०१, बारामती- २४२४, जळगाव- १६०९, औरंगाबाद- २०१४, अकोला- २५५५, अमरावती- १८०५, चंद्रपूर- ८२२, कोकण- ७८५, नांदेड- १४६६, गोंदिया- ७२५ आणि लातूर परिमंडलमधील १४१२ तक्रारींचा समावेश आहे. 

मोबाईल क्रमांकाची नोंदणी आवश्यक 

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार मिस्ड कॉलद्वारे करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. अशा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणच्या ०२२-४१०७८५०० या क्रमांकावर वीजग्राहकांना मिस्ड कॉल द्यावा लागेल. 

एसएमएस साठी कुठलाही मोबाईल 

‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी असणे आवश्यक नाही. कोणत्याही मोबाईल क्रमांकावरून ‘एसएमएस’द्वारे तक्रार नोंदविता येईल. मात्र १२ अंकी ग्राहक क्रमांक अचूक देणे आवश्यक आहे. 

असा करा एसएमएस 

ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून NOPOWER हा ‘एसएमएस’ महावितरणच्या ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास तक्रार नोंदविली जाईल. तसा ‘एसएमएस’ वीजग्राहकांना पाठविण्यात येईल. मात्र ग्राहकाने दिलेला ग्राहक क्रमांक चुकीचा किंवा अवैध असल्यास तक्रार स्वीकारली जाणार नाही. 

वेबसाईटचाही पर्याय 

याशिवाय www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल अॅप तसेच २४ तास सुरु असलेल्या कॉल सेंटरच्या १८००-१०२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार स्वीकारण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com