औरंगाबाद : घाटीचे मेडिकल वेस्ट थेट कचऱ्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 March 2020

नवे चष्मेही फेकले; आयुक्त भडकताच अधिष्ठातांची माफी 

औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (घाटी) धोकादायक जैविक कचरा (मेडिकल वेस्ट) थेट महापालिकेच्या गाड्यामध्ये दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. एका प्लॅस्टिक पिशवीमध्ये शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांचे वापरण्यासाठी असलेले चष्मे आढळून आल्याने महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांचा पारा भडकला. त्यांनी थेट अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांना फोन करून महापालिकेत बोलावून घेतले. वापरलेले इंजेक्शन, शस्त्रक्रिया करताना वापरलेल्या पट्ट्या, सलाईनच्या रिकाम्या बाटल्या कचऱ्यात कशा येतात? असा प्रश्‍न केल्यानंतर अधिष्ठांतासह घाटीच्या इतर अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवला. हा प्रकार गंभीर असून, चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगून येळीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. 

नगरसेवकांनी पडेगाव कचरा डेपोवर पकडलेल्या एका ट्रकमध्ये दहा ते पंधरा काळ्या मोठ्या कॅरिबॅग होत्या. त्यातील काही कॅरिबॅगमध्ये धोकादायक जैविक कचरा होता. नियमानुसार हा कचरा महापालिकेने नियुक्त केलेल्‍या वॉटरग्रेस या संस्थेकडे विघटनासाठी देणे गरजेचे आहे. मात्र हा कचरा थेट कचरा डेपोवर आणला जातो. याठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वेचतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

हेही वाचा- भाजपमधील आरोपींपासूनच महिलांना सर्वाधिक धोका

आयुक्तांनी संबंधित ट्रकचालक व रेड्डी कंपनीच्या पर्यवेक्षकाला हा ट्रक कुठे भरला याची विचारणा केली. त्यावेळी त्याने घाटी रुग्णालयातून भरल्याचे सांगितले. एक-एक कॅरिबॅग रिकामी केली असता, त्यातून मेडिकल वेस्ट बाहेर पडले. तसेच एका कॅरिबॅगमध्ये डॉक्टरांच्या वापरासाठी असलेले नवे चष्मेही निघाले. या चष्म्यांची एक्सपायरी तारीख २०२२ पर्यंत आहे. हा प्रकार पाहताच आयुक्तांचा पारा चढला. त्यांनी थेट अधिष्ठातांना फोन लावून महापालिकेत येण्याची सूचना केली. तासाभरानंतर श्रीमती येळीकर महापालिकेत आल्या. 
 
तुम्हाला कचरा घेताना समजले नाही का? 
 घाटीचा जैविक कचरा पडेगाव कचरा डेपोवर जात असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी डॉ. येळीकर यांना दिली. त्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तुम्हाला कचरा घेताना समजत नाही का? असा प्रश्‍न केला. घाटीमध्ये तीन प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये कचरा जमा केला जातो. यातील दोन पिशव्या वॉटरग्रेस या कंपनीला दिला जातो तर काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशव्या महापालिकेच्या वाहनांमध्ये दिल्या जातात. शनिवारी आढळलेला जैविक कचरा हा काळ्या कॅरिबॅगमध्ये होता. त्यावर हा प्रकार वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी केला असून, सोमवारी यासंदर्भात चौकशी करून कारवाई केली जाईल, असे येळीकर यांनी आयुक्तांना सांगितले. 

हे वाचलंत का? - औरंगाबाद मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी हर्षवर्धन जाधव, दाशरथे

डोळे बंद करून कचरा घ्या... 
यावेळी एका कर्मचाऱ्याने आपण हा प्रकार आपल्या कानावर टाकला होता, त्यावेळी आपण डोळे बंद करून, हा कचरा घ्या, अशा सूचना केल्या होत्या, असे तो येळीकर यांना म्हणाला. मात्र, त्यांनी कानावर हात ठेवले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, फॉरेन्सिक विभागाचे डॉ. कैलास झिने यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Medical West