मोठा दिलासा... बसस्थानके गुरुवारपासून गजबजणार 

अनिलकुमार जमधडे
Wednesday, 19 August 2020

-औरंगाबादेतून विविध जिल्ह्यांत बससेवा सुरू 
-बावीस ते चोवीस प्रवासी बसणार, नियम पाळणार 
-सध्यातरी भाडे कायम राहणार, ई-पासची गरज नाही 

औरंगाबाद ः एसटी महामंडळाची आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्यास शासनाने बुधवारी (ता.१९) परवानगी दिली. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातून गुरुवारपासून (ता.वीस) पुणे, अकोला, नाशिक, नागपूर अशा विविध मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून एसटी बंद होती. त्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन २१ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत होते. एकीकडे प्रचंड तोटा सुरू झाला होता, तर दुसरीकडे खासगी वाहतूक सुरू झाल्याने एसटी बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच आंतरजिल्हा बससेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

अखेर शासनाने ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे एसटी बसने जाणाऱ्या प्रवाशांना ई-पासची गरज राहणार नाही. त्याचप्रमाणे बसमध्ये केवळ बावीस प्रवासी बसण्यास परवानगी देण्यात आली. सध्यातरी एसटीचे भाडे कायम ठेवण्यात आलेले असल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

अशी असेल बससेवा 

मध्यवर्ती बसस्थानक म्हणजे औरंगाबाद आगार क्र. दोन येथून औरंगाबाद- पुणे, अकोला, नाशिक, जळगाव, भुसावळ, शिरपूर, धुळे आणि शेगाव अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे. आगार क्र.एक म्हणजे सिडको बसस्थानकातून औरंगाबाद- पुणे, नागपूर, अकोला, यवतमाळ, लातूर, सोलापूर, वैजापूर, बुलडाणा, बीड, जालना अशी बससेवा चालविण्यात येणार आहे. याशिवाय पैठण आगारातून पुणे, बुलडाणा, भुसावळ, जालना ही बससेवा सुरू होणार आहे. सिल्लोड आगारातून पुणे, मालेगाव, जालना तर वैजापूर आगारातून पुणे, जळगाव, बुलडाणा, मालेगाव तसेच कन्नड आगारातून पुणे, सोलापूर, शेगाव, शहादा ही बससेवा सुरू होत आहे. तर गंगापूर आगारातून पुणे, यवतमाळ, मलकापूर, बुलडाणा आणि मालेगाव त्याचप्रमाणे सोयगाव आगारातून जळगाव, बीड आणि धुळे अशी बससेवा चालविण्यात येणार आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सकाळी सहापासून सेवा 

औरंगाबाद आगार क्र. एक व दोनमधून सकाळी सहापासून बससेवा सुरू होणार आहे. सध्यातरी जुन्या वेळापत्रकानुसार बस सुटणार नाहीत. जसे प्रवासी मिळतील त्याप्रमाणे बस सोडण्यात येतील. साधारण तासाला एक याप्रमाणे बस सोडण्यात येणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Bus Aurangabad