वाहक महिलेच्या "प्रेग्नंसी'वरच शंका!

photo
photo

औरंगाबाद : एसटी महामंडळातील वाहक महिलेच्या गर्भधारणेवरच शंका घेण्याचा "प्रताप' पैठण आगारप्रमुखांसह अधिकाऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, आकसबुद्धीने रेकॉर्ड तयार करून सदर महिलेला थेट बडतर्फ केले. वरिष्ठांकडे अपील केल्यानंतर सेवेत घेण्याची तयारी दर्शवली; मात्र पूर्वीची सहा वर्षांची सेवा समाप्त करण्यात आली. या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. 
एसटीच्या पैठण आगारात वाहक असलेल्या सुमित्रा गर्कळ या सहा वर्षांपासून एसटीच्या सेवेत आहेत. त्यांनी जानेवारी 2018 मध्ये प्रसूती रजेसाठी अर्ज केला होता. आगारप्रमुख तरवडे यांनी अर्ज स्वीकारला. मात्र, श्रीमती गर्कळ यांना अनुपस्थित दाखवण्यात येत असल्याचे लक्षात आले. 

प्रेग्नंसीवर शंका 

श्रीमती गर्कळ यांनी चौकशी केली, तेव्हा तुम्ही रजाच दिली नाही, असे कारण देत श्री. तरवडे यांनी तुमची "प्रेग्नंसी' चुकीची आहे. तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र बदलून आणा, असे फर्मान सोडले. प्रसूतीबाबतची सर्व वैद्यकीय कागदपत्रे सादर करूनही ऐकण्याच्या तयारीत नसलेल्या श्री. तरवडे यांनी जानेवारी 2018 ते एप्रिल 2018 या काळात मेडिकल रजा देण्याची तयारी दर्शविली. प्रत्यक्षात रजा मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवलीच नाही. 

बैठे काम देणार नाही 

श्रीमती गर्कळ यांना बैठे काम देणार नाही, अशी भूमिका आगार व्यवस्थापक तरवडे यांनी घेतली. त्यानंतर बालसंगोपन रजा देण्याऐवजी नोव्हेंबर 2018 पासून सतत अनुपस्थित दाखवून 24 मे 2019 रोजी बडतर्फ केले. श्रीमती गर्कळ यांना वेळोवेळी त्रास देऊन वैद्यकीय प्रमाणपत्र आणि प्रसूतीची कागदपत्रे खोटी असल्याचा आरोप करून त्रास दिला. 

बडतर्फ केल्यामुळे श्रीमती गर्कळ यांनी विभाग नियंत्रकांकडे अपील केले, तेव्हा त्यांना पुन्हा सेवेत घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, पूर्वीची सहा वर्षांची सेवा समाप्त करून टाकली. विशेष म्हणजे, पैठणऐवजी आगार क्र. 2 मध्ये नवीन नेमणूक देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात नवीन नेमणुकीचे आदेश अद्यापपर्यंत दिले नाहीत. 

महिला आयोगाकडे तक्रार 

अधिकाऱ्यांच्या या त्रासाला कंटाळल्याने वाहक श्रीमती गर्कळ यांनी पैठण आगारप्रमुख तरवडे, सहायक वाहतूक अधिकारी गजानन मडके, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, वाहतूक नियंत्रक श्रीमती निसर्गन, शंकर परागे यांच्याविरोधात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे तक्रार दिली आहे.


श्रीमती गर्कळ यांची सर्व कागदपत्रे तपासून त्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. समोर आलेल्या कागदपत्रांवरून निर्णय घ्यावा लागतो. त्यांची जी सेवा समाप्त झाली आहे, त्याबद्दल त्यांनी दुसरे अपील करणे आवश्‍यक आहे. 
- अरुण सिया, विभाग नियंत्रक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com