पंकजांनी मंत्री असताना उपोषण केले असते, तर प्रश्‍न सुटले असते-अशाेक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 January 2020

पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उपोषण केले; मंत्री असताना हे आंदोलन केले असते तर प्रश्‍न मार्गी लागले असते, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 30) लगावला. 

औरंगाबाद- फळे चाखण्यासाठी सत्तेत सहभागी झालो नाही आणि पक्ष गुंडाळून ठेवलेला नाही. 44 चे 100 आमदार कसे होतील तसेच मराठवाड्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी काम करावे लागणार आहे. पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी उपोषण केले; मंत्री असताना हे आंदोलन केले असते तर प्रश्‍न मार्गी लागले असते, असा टोला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी (ता. 30) लगावला. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस सेवादलातर्फे विभागनिहाय 75 किलोमीटर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा विभागाच्या पदयात्रेची सुरवात गुरुवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक औरंगपुरा येथून अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, सचिव मंगलसिंग सोळंकी, प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, शहराध्यक्ष नामदेव पवार, आमदार अमर राजूरकर, इब्राहिम पठाण, चंद्रभान पारखे, मुजफ्फर खान, भाऊसाहेब जगताप, पंकज ठोंबरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

श्री. चव्हाण म्हणाले, कॉंग्रेसच्या विचारधारेला जोपासण्याचे काम सेवा दल अनेक वर्षांपासून करीत आहे. भाजप, आरएसएससारख्या वाढत्या कॅन्सरला रोखून आगामी काळात सेवा दलाने गावागावात पोचून कॉंग्रेसला आणखी भक्कम करावे. कॉंग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झालो तो केवळ फळे चाखण्यासाठी नाही तर मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे आहे. मराठवाड्याचा मानव निर्देशांक कमी असून, तो वाढविण्यासाठी लवकरच वैधानिक विकास महामंडळाची बैठक घेणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वीच्या भाजप सरकारने समाजात विषमता निर्माण करण्याचे काम केले. मतांसाठी फूट पाडली, असा आरोप त्यांनी केला.

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

पंकजा मुंडे यांनी पाणी प्रश्‍नावर नुकतेच उपोषण केले; मात्र मंत्री असताना उपोषण केले असते तर प्रश्‍न तरी मार्गी लागले असते, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण तरुणांच्या पालकांचा, प्रगतिशील शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत करण्यात आली, तर गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. विलास औताडे यांनी प्रास्ताविक केले. 
 
शेतकरी आत्महत्या शरमेची बाब 
सत्तेत कोणताही पक्ष असला; मात्र राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या ही शरमेची बाब आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा विषय सरकारचे प्राधान्य आहे. हे सरकार पाच वर्षे नव्हे तर 15 वर्षे टिकविण्यासाठी प्रयत्न आहेत, असा दावाही अशोक चव्हाण यांनी केला.

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News of Ashok Chavan