संचारबंदीचा फटका, औषधांसाठी भटका...! औषधी दुकाने बंद असल्याने आली वेळ

संचारबंदीचा फटका, औषधांसाठी भटका...! औषधी दुकाने बंद असल्याने आली वेळ

औरंगाबाद : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या कडक संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांचे बहाणे सुरूच आहेत. अनेक वसाहतींमध्ये तरुणांचे जत्थे घराबाहेर घोळक्याने गप्पाटप्पा मारताना आढळले. तर दुसरीकडे मेडिकल दुकाने बंद असल्याने नागरिकांना औषधांसाठीही भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. 

शहरात कोरोनाबधितांचे आकडे भरमसाट वाढत असल्याने प्रशासनाने कडक संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. पूर्वीच्या लॉकडाउनच्या तुलनेत अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पोलिस प्रत्येक चौकाचौकांत डोळ्यांत तेल घालून पहारा देत आहे. अनेक वसाहतींमध्ये पोलिसांची फिक्स ड्युटी लावण्यात आलेली आहे. कुठल्याही परिस्थितीत नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.

तरीही रिकामटेकड्यांचा त्रास मात्र सुरूच आहे. कडक संचारबंदी असतानाही अनेक नागरिक विविध कारणे सांगून रस्त्यावर येत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांवर नागरिकांचा उपद्रव कमी होत नाही. समतानगर, गांधीनगर, सिल्लेखाना, खोकडपुरा; तसेच रेल्वेस्टेशन, हमालवाडा, भीमनगर भावसिंगपुरा, पडेगाव आणि बीड बायपास परिसरात वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांवर तरुणांचे जत्थे गप्पा मारताना दिसून आले. असे असले तरीही पोलिसांची गस्ती पथके मात्र अधूनमधून चक्कर मारून नागरिकांना हुसकावून लावत असल्याचे काही तरुणांनी सांगितले. 

संचारबंदी जाहीर करण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे ८ जुलै रोजी लॉकडाउनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने जाहीर केला. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध खासगी रुग्णालयांमधील १९ दुकाने उघडी राहतील असे स्पष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी प्रशासनाने मात्र सर्व मेडिकल दुकाने सुरू राहतील असे जाहीर केले. या संभ्रमित अवस्थेने संचारबंदीत बहुतांश मेडिकल दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना औषधींसाठी भटकंती करावी लागत आहे. रुग्णालयांच्या आवारातील दुकानदार बाहेरच्या व्यक्तींना औषधी देत नसल्याचा अनुभव नागरिकांनी सांगितला. 

दारूसाठी काहीही, 
पोलिसांनी केली धुलाई! 

असाही प्रसंग ः साहेब काही नाही, मी मित्राची तब्येत बिघडल्याने त्याला बघण्यासाठी बाहेर आलो होतो, असे आझाद चौकामध्ये एका तरुणाने सांगितले; मात्र संशय आल्याने पोलिसांनी प्रश्नांची सरबती केल्यानंतर हा तरुण एन-६ भागात सुरू असलेल्या बेकायदा दारूच्या अड्ड्यावर गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तरुणाची धुलाई तर केलीच, त्याला फटके देत घराच्या कंपाउंडपर्यंत नेऊन सोडत तंबी दिली. त्यानंतर संबंधित दारूविक्री करणाऱ्याचाही शोध सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

औषधीसाठी वणवण 

दुपारी अडीचच्या सुमारास आकाशवाणी चौकातील एका मेडिकल दुकानाजवळ राजेश नामक तरुण भेटला. औषधी दुकान कुठे उघडे आहे अशी विचारणा त्याने केली. आईच्या औषधींसाठी मी भटकंती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सेव्हनहिलजवळ हर्ष मेडिकल दुकान उघडे असल्याचे समजल्यावर तो तरुण बघून येतो, असे सांगत तिकडे गेला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com