प्रकरण गेले थेट मातोश्रीपर्यंत...शिवसेनेच्या आमदार, उपमहापौराससह सहाजणांवर गुन्हे

sanjay shirsath, rajendra janjal
sanjay shirsath, rajendra janjal

औरंगाबाद : दोन कोटी रुपयांचे कंत्राट घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात पक्षाचे शहर संघटक तथा कंत्राटदार सुशील खेडकर यांना शनिवारी (ता. 19) मारहाण झाली होती.

याप्रकरणी श्री. सुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, राजू राजपूत, अनिल बिरारे, नीलेश नरवडे आणि पैठणे यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा नोंद झाला. 

भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना कंत्राट घेण्यात आणि कंत्राटदारात रस असल्याचा आरोप केला होता. त्याचे खंडण करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनेत तसा कोणताही प्रकार होत नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

त्याचबरोबर उपमहापौर जंजाळ यांनी शहराचे आणि महापालिकेचे खरे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून कोण आहेत, असा टोला लगावत श्री. तनवाणी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनंतरच कंत्राट घेण्यावरून शनिवारचा प्रकार घडला. यामुळे खेडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली.

याप्रकरणी खेडकर यांच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. असे असले तरी दिवसभर हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी तसेच पुढे हे प्रकरण वाढू नये यासाठी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न करण्यात येत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

प्रकरण थेट मातोश्रीपर्यंत 
मारहाण सुरू असताना आमदार अंबादास दानवे या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ही हाणामारी झाली. उपस्थितांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी रविवारी दुपारी श्री. खेडकर यांची भेट घेत विचारपूस केली.

त्यानंतर सायंकाळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले यांनीही श्री. खेडकर यांची भेट घेऊन विचारपूस केली. मारहाणीचे हे प्रकरण थेट मातोश्रीवर गेले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर माहिती पक्षाकडून मागवण्याऐवजी थेट पोलिसांकडून मागवण्यात आली असल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com