आता या कामासाठीही महापालिकेची समिती

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद-शहरातील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला असून, सोमवारी (ता.२४) पुन्हा एकदा व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेटसह व्यापारी परिसरात उभ्या राहणाऱ्या हातगाड्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यावर पार्किंग व पथविक्रेता धोरण ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय महापौर नंदकुमार घोडेले यांनी घेतला. 

महापालिकेचे पार्किंग धोरण व हातगाड्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. त्यामुळे सकाळीच पैठण गेट येथील टिळकपथ व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वात सुमारे २०० ते ३०० व्यापारी गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेत धडक घेतली. महापौरांचे दालन गाठत कैफियत मांडली. गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट परिसरात दुकानांसमोरच हातगाडी चालकांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, वाहतुकीची कोंडी होत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत.

त्यामुळे शहरात हॉकर्स झोन निश्‍चित करून हातगाड्यांचा बंदोबस्त करावा, तसेच धोरण निश्‍चित होत नाही तोपर्यंत रस्त्यांवरील वाहनांना पार्किंग शुल्क आकारण्याचा प्रस्तावही रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यावर महापौरांनी पथविक्रेता धोरण निश्‍चित करणे व हॉकर्स झोन ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीत व्यापाऱ्यांचे दोन प्रतिनिधी घेतले जातील, असे आश्‍वासन महापौरांनी व्यापाऱ्यांना दिले. शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, पैठण गेट - टिळकपथ व्यापारी असोसिएशनचे दिलीप चोटलानी, हरविंदरसिंग सलुजा, युसूफ मुकाती, भरत शाह, लक्ष्मीकांत कोल्हे यांची उपस्थिती होती. 
 
पोलिस आयुक्तांची घेतली भेट 
महापौरांना निवेदन दिल्यानंतर या व्यापाऱ्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यावर पोलिस आयुक्‍तांनी दोन दिवसांत गुलमंडी, औरंगपुरा, पैठण गेट या भागाचा सर्व्हे करून हातगाडी चालकांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याचे व्यापाऱ्यांना सांगितले. 

...अन्यथा रोज एक तास बंद 
मुख्य रस्त्यांवर थांबणाऱ्या हातगाड्यांबाबत महापालिकेने व पोलिस प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन बंदोबस्त करावा; अन्यथा रोज एक तास सायंकाळी दुकाने बंद ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आल्याचे असोसिएशनचे सहसचिव भरत शाह यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com