पोलिस पत्नीच्या पगारावर कर्ज उचलून थाटला दुसरा संसार!

सुषेन जाधव
Wednesday, 2 December 2020

 
पोलिस अंमलदार पतीसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल 

औरंगाबाद : पती-पत्नी पोलिस खात्यात नोकरीला. सर्वकाही अलबेल असतानाच संसाराला दृष्ट लागली. पोलिस पत्नीचा सतत छळ आणि तिला मारहाण करून त्रास देणाऱ्या अंमलदाराने तिच्याच पगारावर दोन लाखांचे कर्ज उचलून नवा संसार थाटल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर मात्र पत्नीने पती दीपक भाले याच्यासह इतर सहाजणांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसात तक्रार दिली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

दीपक भाले आणि त्यांची पत्नी हे दोघे औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलात नोकरीला आहेत. भाले यांच्या पत्नीने तक्रारीत आरोप केला आहे की, लग्नानंतर काही महिन्यांनी आपल्याला पती आणि सासू सासऱ्यांकडून हुंड्यासाठी सतत छळ करण्यात येत आहे. मानसिक त्रास देत मारहाण करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी दीपकने पत्नीच्या पगारावर दोन लाखांचे कर्ज काढण्याची मागणी केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पोलिस कर्मचारी विवाहितेने तक्रार दिली. त्यानंतर काही दिवस तिने पतीकडे दुर्लक्ष केले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसरे लग्न केले; पण माहितीच नाही 
महिला पोलिस कर्मचारी पत्नीने आरोप केला आहे, की त्यांच्या पतीने फारकत न देता परस्पर दुसरा विवाह केला. सध्या तो आपल्या दुसऱ्या पत्नीकडे राहतो. त्याला हा बेकायदा विवाह करण्यास त्याच्या आई-वडिलांसह नातेवाइकांनी मदत केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे़ 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तक्रार निवारण दिनात मांडली व्यथा 
तीन दिवसांपूर्वी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या तक्रार निवारणदिनी महिला पोलिस कर्मचाऱ्याने झोन दोनचे उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासमोर पतीने दिलेल्या त्रासाची व्यथा मांडली. त्यावरून उपायुक्त गिऱ्हे यांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून दीपकसह सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police took loan on his wifes salary for second marriage aurangabad news