पोलिओग्रस्त असूनही स्वीमिंगसह बॉडीबिल्डिंग करत मिळवले १८० मेडल 

मधुकर कांबळे  
मंगळवार, 7 एप्रिल 2020

आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये बॉडी बिल्डिंग , स्विमिंग आणि पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत मिळून ५० गोल्ड मेडल, ६० पेक्षा अधिक सिल्वर मेडल तर ७० ब्रांझ मेडल श्री झिटे यांच्या नावावर आहेत. 
 

औरंगाबाद - दीड वर्ष वय असताना पोलिओमुळे एक पाय निकामी झाला...पाचवीपर्यंत आई कडेवर घेऊन जायची तर सहावीपासून मित्रांच्या बोटाला धरुन हळू हळू शिक्षणाची कास धरली ती लॉ विषयातील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

मित्रांच्या पाठबळामुळे व्यायामशाळेत जाण्याचा व पोहण्याचा छंद जडला आणि आजपर्यंत बॉडीबिल्डिंग, पावरलिफ्टींग आणि स्विमिंग या तिन्ही क्रीडाप्रकारात ५० गोल्ड, ६० हून अधिक सिल्वर तर ७० ब्रान्झ मेडल मिळवले आहेत. या जिद्दी दिव्यांगाचे नाव देविदास झिटे असून ते सध्या येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

वडील मुनीम तर आई कापसाच्या मिलमध्ये कामाला. खाराकुंवा येथील जिजामाता शाळेत चौथीपर्यंत तर पुढे गुजराती हायस्कूलमध्ये १० वी पर्यंतचं शिक्षण झाले. पाचवीपर्यंत आई कडेवर शाळेत सोडायची अन् कामावर जायची. ५ वी नंतर मित्रांच्या हाताला धरुन हळू हळू स्वत: शाळेत जाणे सुरु केले. १९८९ मध्ये १० वी झाली आणि तेव्हापासून व्यायामाची सवय लागली. एक किलोमीटर मित्रांसोबत व्यायामाला जायचे. त्याचसोबत सरस्वती भुवन कॉलेजमधून बी. कॉम आणि त्यानंतर लॉ कॉलेजमधून एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. 

नॉनस्टॉप २७०० डिप्स 

श्री.झिटे १९९९ पर्यंत जीममध्ये जायचे. १९९५ - ९५ पहिल्यांदा राज्यस्तरावर दिव्यांगाच्या कॅटेगिरीतून पॅरा ऑलम्पिकमध्ये बॉडीबिल्डिंग स्पर्धेत सहभाग घेतला. १९९६ - ९७ मध्ये बॉडी बिल्डिंगमध्ये पहिले मेडल मिळवले. आत्तापर्यंत बॉडी बिल्डिंगच्या १५-२० स्पर्धांमधून सहभाग घेतला. दीड तासामध्ये नॉन स्टॉप २७०० डिप्स तर एका मिनिटांमध्ये १०० डबलबार मारायचे हा त्यांचा नियमच त्या काळात होता.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

संजीव सराफ या मित्राच्या सांगण्यावरून १९९९ मध्ये स्विमिंग शिकायला सुरुवात केली. सिद्धार्थ जलतरण तलावावर मदन बाशा हे त्यांच्या शाळेतील सिनीअरच स्विमिंग शिकवत, त्यांनी श्री झिटे यांचा उत्साह वाढवत स्विमींग शिकवण्याची जबाबदारी घेतली. यासाठी श्री बाशा यांना " त्यांना स्विमिंग शिकताना काही झाले तर माझी जबाबदारी राहील ' असे जलतरण तलाव व्यवस्थापकांकडे हमीपत्र लिहून द्यावे लागले, तेव्हा कुठे पोहणे शिकण्याची परवानगी मिळाली आणि सहा महिन्यात ते चांगले जलतरणपटू झाले. 

सी स्विमींगमध्येही सहभाग 

देवीदास झिटे यांनी २००३ पासून स्विमिंग स्पर्धेमध्ये सहभाग सुरु केला. २००५ मध्ये स्विमींगमध्ये पहिले मेडल मिळवले. २००९ मध्ये नेव्हीच्या सी स्विमिंग स्पर्धेत सहभाग घेऊन कुलाब्याच्या खाडीमध्ये साडेसहा किलोमीटर स्विमींग केली. त्यापूर्वी सन क्रॉक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत ५ किलोमीटर स्विमिंग केली. याशिवाय मालवण, सिंधुदुर्गजवळच्याही समुद्रात स्विमींग केले असून आत्तापर्यंत ७ ते ८ वेळा सी स्विमींग केली आहे. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये बॉडी बिल्डिंग , स्विमिंग आणि पॉवरलिफ्टिंग या क्रीडा प्रकारांत मिळून ५० गोल्ड मेडल, ६० पेक्षा अधिक सिल्वर मेडल तर ७० ब्रांझ मेडल श्री झिटे यांच्या नावावर आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मित्रांमुळेच सर्वकाही 

घरची परिस्थिती अतिशय हालाखीची असल्याने श्री. झिटे खेळाचा छंद जोपासतच २२ वर्ष पानटपरी चालवत. या काळात संजीव सराफ, सुधीर चिनके , बाळू आंचलिया या मित्रांची खूप मदत झाली. रविंद्रकुमार पाटणकर या मित्रामुळे २०११ मध्ये शासकीय नोकरी लागली.

या मित्रानेच तहसील कार्यालयातील दिव्यांगाच्या जागेसाठीचा अर्ज आणला, त्यानेच तो भरला, डीडीही स्वतःच काढून झिटे यांची स्वाक्षरी घेऊन भरून टाकला होता. सिल्लोड तहसिलमध्ये खेळाडू व दिव्यांगाच्या कोट्यातून लिपिक म्हणून पहिली नेमणूक मिळाली होती. सद्या औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. 

दिव्यांगानी आपणात इतरांपेक्षा काहीही कमी नाही असे समजावे. स्वतःला कमी समजू नका. मेहनत करा. न घाबरता पुढे जा. भलेही कोणी दिव्यांग शरीराने दिव्यांग असेल पण मनाने दिव्यांग राहू नये. दिव्यांगत्वावर मात करून सतत काम करत राहा. यश नक्की मिळेल 

 देविदास झिटे  

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polio Patient Won 180 Medals In Swimming Body Building Aurangabad News