पंतप्रधान साहेब, किमान हाताला तरी काम तरी द्या!

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे जगणं अवघड झालंय. घरात जे काही होतं त्यावर आजवर पोट भरलं; मात्र आता घरात काहीही नाही. विविध योजनांमध्ये मला सहभागी करून त्याचा लाभ मिळायला हवा; मात्र तोपण दिला जात नाही, मग मी कसं जगायचं, असा प्रश्‍न उपस्थित करीत किमान पंतप्रधान साहेबांनी रोजगार हमी योजनेवर तरी काम मिळवून द्यावं, अशी मागणी मांडकी येथील नंदाबाई श्रीरंग डक यांनी केली आहे. याविषयी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निवेदन पाठविले आहे. 

कोरोना आला आणि अनेकांच्या जगण्याचे वांधे झाले. लोकांच्या हातचे काम गेले. त्यातच शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचत नसल्याने त्यांचे जगणे अवघड बनले आहे. याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे औरंगाबाद शहराजवळील मांडकी येथील नंदाबाई आहेत. त्या विधवा असून भूमिहीन आहेत. त्यांना ११ वर्षांचा मुलगा विवेक, एक नऊ वर्षांची मुलगी दिशा असे दोन लेकरं. लॉकडाउनच्या काळात शेतमजुरांना आर्थिक मदत देण्यात यावी,

उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळावा, जनधन योजनेचा देखील लाभ मिळावा. याबाबत ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांच्यासह संबंधितांकडे अर्ज केले. मात्र, त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. यापैकी कुठला ना कुठला लाभ मिळायला हवा, यासाठी त्यांनी शासन दरबारी अर्जही केले. मात्र, खऱ्या वंचितांची दखल घेईल, ते शासन कसलं? अशी वागणूक त्यांच्या वाट्याला आली. त्यामुळे त्यांनी योजनांचा लाभ देणार नसाल तर रोजगार हमी योजनेतून किमान हाताला काम तरी द्या, अशी मागणी थेट पंतप्रधानांकडे केली आहे. 

शासनाने १० किलो मोफत तांदूळ दिले व विकतचे १० किलो असे २० किलो धान्य दिलेले आहे. तांदळाची खिचडी, भाजी करण्यासाठी तेल, मिर्ची, मीठ यासह अन्य साहित्याची सुद्धा गरच असते. नियमित केवळ तांदूळच खाऊ शकत नसल्याने मला दिलेले तांदुळ पडून आहेत. हे तांदूळ दुसऱ्या व्यक्तींना कामी यावेत, यासाठी ते शासनाला परत पाठवत आहे. 
- नंदाबाई डक, विधवा, भूमिहीन, बेघर महिला, मांडकी. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com