कोरोनाला रोखणारा काय आहे पुंडलिकनगर पॅटर्न, इतर ठिकाणीही राबवणार का?

 Pundalik Nagar pattern against Corona
Pundalik Nagar pattern against Corona

औरंगाबाद : एकीकडे शहराच्या नवनवीन भागात कोरोनाचा शिरकाव होत असला तरी दुसरीकडे कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या भागातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. पुंडलिनगरातील सहा गल्ल्यांमध्ये तब्बल ५२ रुग्ण आढळले होते. यातील ४३ जण सध्या ठणठणीत होऊन घरी परतले आहेत तर एकाचा मृत्यू झाला. आता रुग्णसंख्या कमी झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील क्वारंटाइन व्यक्तींनी घराबाहेर पडूच नये, यासाठी गस्ती अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, हे अधिकारी क्वारंटाइन व्यक्तींची हजेरी घेतात. तसेच संबंधिताचे मोबाईल लोकेशनही तपासले जाते. त्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याचे समन्वय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी सांगितले. त्यामुळे आता शहरातील इतर ठिकाणी प्रशासन पुंडलिकनगर पॅटर्न राबवणार का, याकडे लक्ष लागले आहे.

शहरात रुग्णसंख्या तब्बल १,३०० च्या पुढे गेल्यामुळे पालकमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दखल घेत वारंवार अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात समन्वयक म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या; मात्र तोपर्यंत नूर कॉलनी, भीमनगर-भावसिंगपुरा, मुकुंदवाडी-संजयनगर, पुंडलिकनगर हे भाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होते. दाट लोकवस्तीचे हे भाग असल्यामुळे रुग्णसंख्या कमी होणे आता अशक्य आहे, अशीच चर्चा शहरभर होती; मात्र अवघ्या दोन आठवड्यांत या भागातील रुग्णसंख्या एकेरी आकड्यावर आली. त्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांचे नियोजन कामी आले. पुंडलिकनगर भागातील परिस्थितीची माहिती देताना सोहम वायाळ म्हणाले, की गल्ली नंबर एक, दोन, सहा, सात, नऊ व दहामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे आधी पथकातील डॉक्टरांनी नागरिकांशी संवाद साधून जनजागृती केली. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना नव्या नियमानुसार होम क्वारंटाइन केले जात आहे.

हे नागरिक घरातच राहतात का? याची माहिती घेण्यासाठी गस्ती पथक नियुक्त केले. प्रत्येकाला ठराविक काळासाठी ड्युटी देऊन क्वारंटाइन व्यक्ती घरातच राहते का? हे तपासण्याचे काम गस्ती अधिकाऱ्याला देण्यात आले. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आळा बसला; तसेच ज्यांना अत्यावश्‍यक साहित्याची गरज आहे त्यांना स्वयंसेवकामार्फत साहित्य पुरवठा करण्यात आला. 
  
तरुणांना भावनिक साद 
रुग्ण आढळून आलेला भाग सील केला असला तरी अनेक तरुण काम असल्याचे सांगून बाहेर पडायचे. आम्हाला काय होणार? असा त्यांचा आविर्भाव असे. त्यामुळे तुम्ही सेफ राहाल; पण तुमच्या घरातील वृद्ध, लहान मुले मात्र कोरोनातून सुटणार नाहीत. त्यांना तुम्ही अडचणीत आणू नका, अशी साद तरुग्णांना घालण्यात आली. त्यानंतर अनेकांनी घरातच राहणे पसंत केले व कोरोनाची साखळी तोडण्यास मदत झाली. 

मोबाईलवर पोलिसांचा वॉच 
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या भागात बाहेरच्या व्यक्तीला आत जाण्यास तर आतल्या व्यक्ती बाहेर जाण्यास बंदी आहे. त्यानंतरही काही जण पोलिसांची नजर चुकवून बाहेर जात होते. त्यांचे मोबाईल ट्रेस करून पकडण्यात आले. दोघांना अशा प्रकारे पकडल्यानंतर चालबाजी चालणार नाही, हे नागरिकांच्या लक्षात आल्याचे सोहम वायाळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com