esakal | FACT CHECK : छतावर नमाज; मंदिरात मारहाण, काय आहे सत्य?
sakal

बोलून बातमी शोधा

Reality Is Different NAMAZ On The Roof Fight In Temple

सद्यःस्थितीत सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या काही अफवांची सत्यता खास eSakal.com च्या वाचकांसाठी 

FACT CHECK : छतावर नमाज; मंदिरात मारहाण, काय आहे सत्य?

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियात अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे कुठलीही शहानिशा न करता अनेकजण या पोस्ट शेअर, फॉरवर्ड करीत आहेत. त्याचा परिणाम समाजावर होत आहे. सद्यःस्थितीत सर्वाधिक व्हायरल होणाऱ्या अशा काही अफवांची सत्यता खास eSakal.com च्या वाचकांसाठी... 
 

छतावर नमाज पठण 

लॉकडाउनच्या काळात भारतात मुस्लिम बांधव छतावर सामुदायिक नमाज पठण करीत आहेत, अशी भडकावू पोस्ट आणि छतावरच्या नमाज पठणाचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. हे खरं आहे का, याची पडताळणी ‘ई-सकाळ’ने केली असता हे छायाचित्र कुवैतमधील असल्याचे स्पष्ट झाले. रिव्हर्स इमेज सर्चिंगमध्ये आम्हाला अरबी वेबसाईट HowiyaPress वर १३ एप्रिल २०२० चा एक लेख मिळाला. त्यात हे छायाचित्र प्रकाशित केल्याचे आढळले. या लेखानुसार हा फोटो कुवैतमधील जेलेब अल-शुयुक नावाच्या शहरातील आहे. याशिवाय Khalejia News ने याबाबत एक व्हिडिओ ट्विट केल्याचेही आढळले. त्यात म्हटले की, कुवैतच्या अल-शुयुक शहरात छतावर मुस्लिम बांधव नमाज पठण करीत आहेत. कोरोना व्हायरसमुळे अल-शुयुक या शहरात दोन आठवडे लॉकडाउन आहे. त्यामुळे नागरिक छतावर नमाज पठण करीत आहेत. पण, काही समाजकंटक हे छायाचित्र भारतातील असल्याचे भासवत समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. 

दरम्यान, या फोटोत अल फाहिदी ऐतिहासिक स्थळामधील अल फारूक मशिदीचा हा मिनार दिसत आहे. त्यामुळे हा फोटो दुबई कॅनॉलच्या तटावर स्थिती मशिदी जवळचा असल्याचा दावा 'फॅक्ट क्रेसेंडो'ने केला. त्यांनी म्हटले की व्हायरल फोटोच्या डावीकडील वरच्या कोपऱ्यात एक पिवळसर तांबड्या रंगाची एक इमारत दिसते. गुगल मॅप्सच्या सहाय्याने आसपास शोध घेतल्यावर तीदेखील सापडली. जुन्या बलादिया रस्त्यावर बेलहुल मशिदीसमोर ही इमारत आहे. 

हेही वाचा - धक्कादायक! ५०० पटींनी वाढले आंबटशौकीन, महाराष्ट्र मात्र सभ्य
 

मंदिरात पोलिसांना मारहाण 

लॉकडाउन काळातही मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. या भाविकांवर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिसाला भाविकांनी काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी एक ४४ सेकंदाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याचाही आम्ही शोध घेतला असता या व्हिडिओ क्लिपबाबत केलेला दावा खोटा असल्याचे समोर आले. यूट्युबवरील एका वेबसिरीजमधील हे दृश्य असून, हा व्हिडिओ २०१९ मध्ये अपलोड झाला. त्याचा लॉकडाउनशी काहीएक संबंध नाही. मालिकेतील ते दृश्य आहे. 
 

हे वाचले का ? कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?

यूपीएससी, एमपीएससीची परीक्षा रद्द 

लॉकडाउनमुळे यूपीएससी, एमपीएससी परीक्षा रद्द झाल्या, असे मेसेज व्हायरल झाले आहेत. सोबतच यासंबंधी एका वृत्तवाहिनीच्या वृत्ताचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. पण, यूपीएससी, एमपीएससी परीक्षा रद्द केल्या ही एक अफवाच आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) १५ एप्रिल २०२० रोजी एक प्रसिद्धिपत्रक काढले. यात कुठेही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे म्हटलेले नाही. 

जाणून घ्या - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम? 

 
कोंबडीला कोरोना 

एका हिंदी वर्तमानपत्रातील बातमीचे कात्रण सध्या व्हायरल झाले आहे. बिहारमध्ये एका कोंबडीला कोरोना संसर्ग झाल्याचा दावा या बातमीत केला गेला आहे. याबाबत आम्ही खरे काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, ही बातमी खोटी असल्याचे समोर आले. कोंबडीला कोरोना होऊ शकत नाही, असे यापूर्वीच आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. एवढेच नाही, तर बातमी कुठेच छापून आली नाही. काहींनी खोडसाळपणा म्हणून मुद्दामहून अशी फोटोकॉपी क्रिएट करून ती व्हायरल केल्याचे आढळले.