पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया कराच, ही आहे पद्धत, अन टाळा किडींचा संभाव्य धोका

Seed Treatment
Seed Treatment

औरंगाबाद: शेती उत्पादनात प्रामुख्याने पीक संरक्षण हे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच बीजप्रक्रियाही महत्त्वाची असते. एकंदरित पिकाच्या उत्पादनाचे गणिती यावर अवलंबून असते. मात्र, आपल्याकडे पाहिजे तितक्या प्रमाणात अजूनही बीजप्रक्रिया केली जात नाही. परिणामी, उल्प उत्पादनासारख्या गोष्टी घडतात.

मुख्यत्वेकरून उभ्या पिकांवरील रोगाचे नियंत्रण करण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास संभाव्य धोका कमी होतो, असे भाकित कृषी शास्त्रज्ञ वर्तवितात. कारण उभ्या पिकावरील रोगांचे मूळ हे बियाण्यामध्ये असते आणि पीकांची वाढ झाल्यास कीड रोगांचा प्रादूर्भाव पूर्णपणे नष्ट होईलच याची शाश्‍वती आजवर तरी कोणी दिलेली नाहीय. 

प्रामुख्याने बीजप्रक्रिया जैविक (जिवाणू संवर्धक बीजप्रक्रिया), रासायनिक बुरशीनाशक या पद्धतीने बीजप्रक्रिया करतात. बुरशीनाशकाचा बीजप्रक्रियेसाठी वापर-थायरमद्वारे २० ते ३० ग्रॅम थायरममध्ये १० किलो बियाण्याची बीजप्रक्रिया होते. सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी बाविस्टिन किंवा थायरमची दोन ते तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणानुसार बीज प्रक्रिया करावी.

जर ट्रायकोडर्मा असेल तर थायरमचा वापर करू नका. मुख्यत्वेकरून सोयाबीन पिकाला बीजप्रक्रिया करताना बी जास्त ओले होणार नाही याची काळजी घ्यावी, एखाद्या खताची गोणी किंवा कॅरिबॅगमध्ये बियाणे टाकून बीजप्रक्रिया करा. धातूचे भांडे वापरू नये. त्यानंतर साधारण २५ ते ३० मिनिटे सावलीत सुकवूनच पेरणी करा, कारण हाताने बीजप्रक्रिया करताना सोयाबीनचे टरफले निघण्याची शक्यता असते आणि टरफले निघल्यानंतर उगवणशक्ती कमी येण्याच शक्यता असते, असे शास्त्रज्ञ डॉ. के. टी. जाधव यांनी सांगितले. 

ट्रायकोडर्मा व्हिरिडी बुरशीनाशक वापरा 
तूर, मूग, उडीद आदि डाळवर्गींय पिकांवर येणाऱ्या मर रोगाला प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे जैविक बुरशीनाशक वापरावे. हे बुरशीनाशक कृषि विद्यापीठांच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, पैठण रोड येथेही मिळण्याची सोय आहे. याशिवाय सोयाबीन पिकाला रायझोबियम जॅपोनिकम (५० मिलि प्रति १० किलो बियाण्यास द्रावण स्वरूपात असल्यास) हे नत्र स्थिरीकरण करण्यासाठी जिवाणूसंवर्धक वापरावे असेही डॉ. जाधव यांनी सांगितले.

याशिवाय तूर पिकाला रायझोबियमने बीजप्रक्रिया (१० किलो तूर बियाण्यासाठी १०० मिली) या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. डाळवर्गीय पिकांना रायझोबियम बरोबरच स्फुरद विरघळणारे जिवाणू (पीएसबी)आणि पोटॅश सोलबीलिझिंग बॅक्टरिया या जिवाणू संवर्धकांचीचा वापर करावा जेणेकरून स्फुरद आणि पोटॅश याची उपलब्धता वाढते. तृणधान्य पिकांसाठी ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, आणि पोटॅश सोल्यूबलायझिंग या जिवाणू संवर्धकाची (१०० मिली १० किलो बियाण्यासाठी द्रावण स्वरूपात उपलब्ध असल्यास) बीज प्रक्रिया करावी.

ज्वारी पिकासाठी थायमेथॉक्झाम तीन ग्रॅम प्रति किलो बियाण्यास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. बाजरीचे बियाणे घरचे असल्यास किंवा बीजप्रक्रिया केलेले नसल्यास अरगट रोगाच्या प्रतिकारासाठी वीस टक्के मिठाच्या द्रावणात टाकून तरंगणारे बियाणे बाजूला करावे. गोसावी रोगाच्या प्रतिकारासाठी मेटल्एक्सिल सहा ग्रॅम प्रति किलो बियाण्यास वापरावे. बीज प्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक, कीटकनाशक व नंतर जिवाणूसंवर्धकाचा वापर करावा, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. 

जमिनीत पोटॅश उपलब्ध असते. पण, ते पिकाला मिळत नाही. या पोटॅशची उपलब्धतता वाढविण्यासाठी पोटॅश सोल्यूबलाझिंग बॅक्टरिया (पोटॅश सोल्यूबलिझंग विरघळविणारे जिवाणू) याची प्रक्रिया करावी. 
- डॉ. के. टी. जाधव. शास्त्रज्ञ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com