शिवराज्याभिषेक दिन विशेष : असे होते शिवरायांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित​

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

सध्या हे पत्र संत ज्ञानेश्वर उद्यानातील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या बाळासाहेब पाटील पुराणवस्तू संग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

पैठण (जि. औरंगाबाद) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः मोडीलिपीत लिहिलेले पत्र येथील पुराणवस्तू संग्रहालयात आहे. हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने येतात आणि भारावून जातात. येथील इतिहास संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक बाळासाहेब पाटील यांनी हे पत्र जतन करून ठेवले होते. छत्रपती शिवरायांनी भोसले घराण्याचा धार्मिक विधी करण्याचे अधिकार पैठण येथील गोविंद कावळे भट यांना दिले होते. त्या संबंधीचा उल्लेख या पत्रात आहे. हे पत्र शके १५८१ मध्ये देण्यात आले असल्याची नोंद या पत्रात आहेत.

सध्या हे पत्र संत ज्ञानेश्वर उद्यानातील राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या बाळासाहेब पाटील पुराणवस्तू संग्रहालयात शिवप्रेमींना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या पत्रासह या संग्रहालयात प्राचीन काळातील लाल मातीच्या विविध मूर्ती, खेळणी आणि स्त्री, पुरुषांची तत्कालीन आभूषणे कर्णफुले, अंगठ्या, बांगड्या, पदके चांदीची नाणी, नाण्यांचे साचे, मुद्रांचे ठस्से, वजने हस्तीदंती भोवरा, हांडाचा कज्जलशलाका, दगडी पाटे, जाती, लाकडी, पितळी दिवे, दगडी दिवे टांगते दिवे, पैठणी साडी वीणण्याचे साहित्य, लाकडी नक्षी काम, काचेवरील चित्रे, विविध आकाराच्या तलवारी, बंदुकी, छोट्या तौफा, वाघनखे संदेशवाही साधूची काठी, विविध अलंकाराचे दगडी साचे, ताम्रपाषाण काळातील नक्षीकामे, मोर्य काळातील चकचकीत खापरे आदी दुर्मिळ वस्तू आहेत.

Shivaji Maharaj Letter
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ताक्षरातील मोडी पत्र

छत्रपती शिवाजी महाराज पैठण येथे आले होते. त्याकाळी गोविंद कावळे यांच्याकडे भोसले घराण्यातील मालोजीराव व त्यांच्या पुर्वाजांच्या वंशावळी कावळे भट पुरोहितांनी दाखविल्या होत्या. त्यात तीर्थाच्या स्थळी होणारे विविध धार्मिक विधी कावळे भट यांच्याकडूनच करण्यात आल्या होत्या. वंशावळीचा हा पुरावा पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी भोसले घराण्यातील कोणीही पैठणला येईल त्यावेळी भोसले घराण्यातील धार्मिक विधी करण्याचा अधिकारी कावळे भट यांना या पत्राद्वारे दिला होता.

हेही वाचा -  छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली, मागणी प्रचंड 

शिवाजी महाराज आग्राभेटीच्या वेळी पैठण येथून जात असताना अधिकाराचे हे दानपत्र त्यांनी दिले. भोसले घराण्यातील कोणीही पैठणला येईल त्यावेळी कावळे भट हेच पुरोहित भोसले घराण्याचा धार्मिक विधी करतील, असा आशय या पत्रात आहे. इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षराचे हे पत्र असल्याचे प्रमाणित केले आहे. 
- जयवंत पाटील, पुराणवस्तु संग्राहक बाळासाहेब पाटील यांचे पुत्र.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj HandWriting Letter In Paithan