धक्कादायक! प्राथमिक शिक्षक गणितास अपात्र

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणित शिकविण्यासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये पात्रताच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची शक्‍यता आहे. 
राज्यात दोन वर्षांपूर्वी शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा, विज्ञान आणि मानव्यशास्त्र विषयांसाठी तीन शिक्षकांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये ज्या शाळेत आठवीचा वर्ग लागून असेल त्यासाठी तीन, तर ज्या शाळांमध्ये इयत्ता आठवीचा वर्ग नाही अशा ठिकाणी विज्ञान व मानव्यशास्त्र अशा दोन विषयांसाठी दोन शिक्षक देण्याचे ठरविण्यात आले होते; मात्र यंदा झालेल्या शिक्षक भरतीमध्येही बीएस्सी, बीएड उमेदवारांची निवडच केलेली नाही. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी म्हणून बारावी विज्ञान असलेल्या शिक्षकांकडेच ती जबाबदारी देण्यात आली आहे. 

मुक्त विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण 
सध्या जे शिक्षक शिक्षण सेवेत आहेत, अशा बारावी विज्ञान असलेल्या शिक्षकांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीएस्सी अभ्यासक्रम सेवाअंतर्गत पूर्ण करण्याची संधी देण्यात आलेली आहे. 

अनधिकृत इंग्रजी शाळेत शिक्षकही अनधिकृत 
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील खासगी इंग्रजी शाळांची तपासणी सुरू आहे. या तपासणीमध्ये अनेक शाळा अनधिकृत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या शाळांमधील अनेक शिक्षक पदवीधर नाहीत. काही शिक्षकांचे शिक्षण केवळ दहावी-बारावी झाल्याचे उघडकीस आले असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पन्नास इंग्रजी शाळा अनधिकृत 
शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक इंग्रजी विभागाच्या खासगी शाळा आहेत. त्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त शाळा अनधिकृत आहेत. यातील ज्या शाळा कुठल्याच नियमात बसत नाहीत, अशा अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच या शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र आजही या शाळा राजरोसपणे सुरू आहेत. 

सेमी इंग्रजी शाळांची स्थिती नाजूक 
सेमी इंग्रजी शाळेसाठी शासनाकडून नियमित बीएस्सी, बीएड अभ्यासक्रमातील शिक्षकांची निवड न केल्याने जिल्हा परिषद व खासगी अनुदानित मराठी शाळेत इंग्रजी माध्यमातून दिले जाणारे गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षणावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मराठी माध्यमातून डीएड झालेल्या शिक्षकांना आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकविताना गणित, इंग्रजी, विज्ञान शिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे ना धड मराठी, ना धड इंग्रजी अशी विद्यार्थ्यांची अवस्था आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून गणित, विज्ञान शिकविण्यासाठी बीएस्सी झालेल्याच शिक्षकाची नियुक्ती करावी. सध्याची जिल्हा परिषदेच्या काही शाळांची परिस्थिती पाहता हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. 
संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com