हृदयद्रावक : कर्तव्य आटोपून सुटीवर आलेल्या जवानाचा विजेचा धक्क्याने मृत्यू

संतोष शिंदे
Thursday, 4 June 2020

निंभोरा (ता.कन्नड) येथील दुर्दैवी घटना.

पिशोर (जि. औरंगाबाद) : आर्मी मेडिकल कॉर्पसच्या कोविड-19 विभागात  कर्तव्य आटोपून गावी आलेल्या जवनाचा विलगीकरण कालावधित स्वतःच्या घरी विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना निंभोरा (ता.कन्नड) येथे घडली. जितेंद्र लक्ष्मण सोनवणे असे मृत सैनिकाचे नाव आहे. आर्मी मेडिकल कॉर्पसच्या युनिट 165 मध्ये तो कार्यरत होता.

गावी सुटीवर येण्यापूर्वी त्याने आर्मीच्या  कोविड-19 रुग्णालय कर्तव्य बजावले होते. तीन दिवसांपूर्वी गावी आल्यानंतर  खबरदारी म्हणून जितेंद्र स्वतःच्या घरी विलगीकरणात होता. गुरुवारी (ता.चार) सायंकाळी सहा वाजेदरम्यान स्वतःच्या घरी छतावर उघड्या तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यातच त्याचा जागेवर मृत्यू झाला. संपूर्ण निंभोरा गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

औरंगाबाद येथे थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 
 
 
रेशन दुकान मालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

औरंगाबाद : हर्सूल परिसराच्या एकतानगरमध्ये रेशन दुकानासमोर तांदळाचा टेंपो रिकामा करताना दुकानदारासह त्याचा भाऊ, टेंपोचालक व हमालाला विजेचा धक्का बसला. यात दुकानदाराचा दुर्दैवी अंत झाला. तिघांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

एकतानगरातील राहुल ज्ञानेश्वर गायके (वय ३५) यांचे रेशन दुकान आहे. बुधवारी (ता. तीन) रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने त्यांच्या दुकानासमोर असलेल्या विजेच्या खांबावरील तारा तुटून पडल्या. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपाचे काम करून वीजपुरवठा सुरळीत केला होता. गुरुवारी दुपारी धान्य वाटप करण्यासाठी तांदळाचा टेंपो (एमएच-२०-एफ-६३४६) गायके यांच्या दुकानासमोर आला. त्यावेळी राहुल गायके, त्यांचा भाऊ, टेंपोचालक आणि हमाल असे चौघेही तांदळाची पोती दुकानात ठेवत होते. त्यावेळी लोंबकळलेल्या विजेच्या तारेचा टेंपोला धक्का बसला. यात गायके हे जागीच बेशुद्ध झाले तर अन्य तिघे गंभीररीत्या भाजले. नागरिकांनी चौघांना तत्काळ घाटी रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी राहुल गायके यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 
 
अधिकाऱ्यांवर कारवाई करा 
पाऊस आणि वाऱ्यामुळे रेशन दुकानासमोरील केबल तुटली होती. त्यानंतर नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांना वारंवार संपर्क साधून केबलचे काम करण्यास सांगितले. मात्र, एजन्सीचे कर्मचारी जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरवात होणार नाही, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier dies of electric shock at Nimbhora Tq Kannada