आशादायक : राखीव पोलीस बलाचे 67 जवान कोरोनामुक्त

राजेभाऊ मोगल
Tuesday, 19 May 2020

मालेगाव बंदोबस्त वरून परत आल्यानंतर 93 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सातारा परिसर येथील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये
आयसोलेशन करण्यात आले होते.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच दुसरीकडे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 सातारा परिसर येथील 67 जवान कोरोना मुक्त झाल्याचे आशादायक चित्र समोर आले आहे.

मालेगाव बंदोबस्त वरून परत आल्यानंतर 93 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सातारा परिसर येथील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये
आयसोलेशन करण्यात आले होते. औरंगाबादमध्ये अगदी धडकी भरेल, अशा वेगाने कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीही आकडा मात्र कमी होण्याचे नाव घेत नाहीये. यामुळे प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येक जण याबद्दल भीती व्यक्त करत आहे.

हेही वाचा- लाॅकडाऊन शिथिल सहा तास सुरु राहणार दुकाने

कोरोना झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वेगाने वाढत आहे दरम्यान, मालेगाव येथून बंदोबस्त वरून परत आल्यानंतर ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची 8 रोजी कोरोना चाचणी केली असता त्यामधील 74 पोलीस कर्मचारी कोरोना बाधित म्हणजे पॉझिटिव्ह आले होते. तसेच त्यांच्यावर औरंगाबाद महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाडळकर, सातारा परिसरातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुणे, त्यांच्या वैद्यकीय पथकासह तसेच गट रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास वावळे, औषध निर्माता राजेंद्र बोराडे, अनिल सुर्यवंशी,  मुकेश कासट यांनी कर्मचार्‍यांवर औषधोपचार केला.

मंगळवारी (ता.19) रोजी या बाधित पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांची चाचणी निगेटिव आल्याने ही एक आशादायक बाब म्हणावी लागेल. सातारा परिसरातील श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज येथे या सर्वांना आयसोलेशन करण्यात आले आहे. या सर्वांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्यक समादेशक आय. एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.एल. सपकाळ, आर. ए. राऊत, पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. राऊत, पठाण यांच्यासह अन्य जवानांनी विशेष परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srpf Corona Update Aurangabad News